अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या कळवण विधासभा मतदारसंघात दोन वेळचा अपवाद वगळता ४० वर्षे पवार कुटुंबियांचे वर्चस्व राहिले आहे तर लगतच्या सुरगाणा मतदारसंघातून माजी आमदार जीवा पांडू (जे.पी.) गावित हे ही ३० वर्षे विधानसभा सदस्य राहिले आहेत. मात्र, २००९ मध्ये झालेल्या पुनर्रचनेत नव्याने कळवण- सुरगाणा मतदार संघ अस्तित्वात आल्याने दोन्ही नेत्यांमध्ये काट्याची लढत झाली. २००९ मध्ये ए. टी. पवार तर २०१४ मध्ये जे. पी. गावित यांनी विजय मिळवला. २०१९ मध्ये ए. टी. पवार यांचे पुत्र नितीन पवार यांनी विजयश्री प्राप्त करीत जे.पी. गावित यांचा पराभव केला. अलिकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर या मतदारसंघाची समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पुन्हा आमदार नितीन पवार तर महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या माकपकडून जे. पी. गावित यांनी तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे तिसरा पर्याय म्हणून नवीन चेहरे मोठ्या संख्यने गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. अपक्ष म्हणून नगरसेवक रमेश थोरात यांनीही चाचपणी सुरू केल्याचे चित्र आहे.
२०१९ मध्ये विद्यमान आमदार नितीन पवार यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत एंट्री करून सातवेळा विधानसभेत निवडून गेलेल्या माजी आमदार जे. पी. गावितांना ६५९६ मतांनी आस्मान दाखवले होते. सुरगाणा तालुक्यातील शिवसेना उमेदवार मोहन गांगुर्डे यांनी २३,०५२ मते घेतल्याने मत विभाजन होऊन गावित यांना फटका बसला होता. आता पुन्हा पवार आणि गावित आमने- सामने उतरण्याची शक्यता आहे. अर्थात, यावेळी राजकीय समीकरणे बदलली आहेत. ओतूर धरणाचा प्रलंबित प्रश्न सोडण्यात ५ वर्षांत आलेले अपयश लपविण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर कामाची निविदा काढल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत गावित यांनी आघाडीचा धर्म पाळल्यामुळे महविकास आघाडीची ताकद गावित यांच्या बाजूने उभी राहण्याची शक्यता आहे. पेसा भरती आंदोलनाचा मुद्दाही निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीत कळवण तालुक्यातून भाजपला कमी मतदान मिळाले. त्यामुळे विद्यमान आमदारांनी युतीचा धर्म पाळला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.
सुरगाणा तालुक्यातील जे. पी. गावित यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले कॉंग्रेसचे चिंतामण गावित आणि शिवसेनेचे मोहन गांगुर्डे यंदा महविकास आघाडीमुळे एकत्र आले आहेत. मात्र, त्याचा फायदा करून घेण्यात गावित किती यशस्वी होतात, यावरही त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार नितीन पवार, माकपाकडून माजी आमदार जे. पी. गावित, रमेश थोरात, एन. डी. गावित, समीर चव्हाण, बेबीलाल पालवी, तुळशीराम खोटरे यांच्या नावांची चर्चा आहे. त्याचबरोबर गीतांजली गुळे, जयश्री पवार, प्रविण पवार, इंद्रजीत गावित, मोहन गांगुर्डे, चिंतामण गावित, राजेंद्र ठाकरे, देवीलाल पालवी यांचीही नावे चर्चेत आहेत.
नितीन पवार- राष्ट्रवादी काँग्रेस- ८६८७७
जिवा पांडू गावित- माकपा- ८०२८१
मोहन गांगुर्डे- शिवसेना- २३०५२
राजेंद्र ठाकरे- मनसे- ११५७