Vasaka Karkhana | ठरलं ! वसाका विक्री न करता भाडेतत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय

मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थित झाली बैठक

Vasant Dada Cooperative Sugar Factory
मुंबईत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत वसाका भाडेतत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. Pudhari Photo
Published on
Updated on

देवळा (जि. नाशिक) ; तालुक्यातील विठेवाडी येथील वसंत दादा सहकारी साखर कारखान्याची कोणत्याही परिस्थितीत विक्री होऊ देणार नसून, कामगार व ऊस उत्पादकांचे हित लक्षात घेऊन कारखाना आगामी काळात भाडे करारानेच चालविण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय बुधवार दि. ४ रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली.

या निर्णयाकडे वसाका कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक व कामगारांचे लक्ष लागून राहिले होते. कालच्या अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वसाका भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाल्याने कळवण ,सटाणा, देवळा ,चांदवड या चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्याच्या सभासद कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.

मधल्या काळात राज्य सहकारी बँकेने कर्ज वसुली साठी कारखाना विक्री ची निविदा प्रसिद्धी केली होती. या प्रक्रियेला कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांनी तीव्र विरोध दर्शविला होता. कारखान्याची कोणत्याही परिस्थितीत विक्री होऊ नये यासाठी वसाका कार्यस्थळावर सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात आले होते. यासाठी बचाव कृती समितीच्या माध्यमातून आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या शिष्टमंडळाने मध्यंतरी कळवण दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. पवार यांनी याबाबत मुंबईत बँकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार काल बुधवारी झालेल्या बैठकीत वसाका हा भाडे करारानेच देण्यात येईल असे राज्य सहकारी बँकेने मान्य केले.

यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आ. डॉ. राहुल आहेर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अनासकर , अप्पर मुख्य सचिव वित्त ओ. पी गुप्ता, विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था आर. एफ. निकम यांच्यासह कृती समितीचे पंडितराव निकम, विलास देवरे, अरुण सोनवणे, सुनील देवरे, कामगार प्रतिनिधी हिरामण बिरारी, विलास सोनवणे, नंदू जाधव, रवींद्र सावकार, नाना देवरे, मुरलीधर धामणे, सतीश शिरुडे आदींसह वित्त व सहकार विभागाचे तसेच राज्य सहकारी बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news