कळवण : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यातील अभोणा पोलिस ठाणे हद्दीत अवैध मटका, जुगार आणि गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून होत आहे. बोळकी पाडा, उंबरगव्हाण, मांगलीदर परिसरात अवैध धंदे खुलेआम सुरू असल्यामुळे कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच अवैध व्यवसायांमुळे अनेक आदिवासी कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
परिसरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांमुळे अनेक कुटुंबातील कर्ते पुरुष मटका, जुगार आणि दारूच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी महिलांवर येऊन पडली आहे. शेती आणि शेतमजुरी करून महिलांना घर चालवावे लागत आहे. मात्र, रोजंदारीतून मिळणारे पैसे घरातील पुरुषांकडे न दिल्यास, महिलांना मारहाण आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत.
आदिवासी पश्चिम पट्टा अवैध धंदे करणाऱ्यांसाठी सुरक्षित ठिकाण झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांनी उंबरगव्हाण, मांगलीदर आणि बोळकी पाडा परिसरात आपले जाळे विस्तारले आहे.
स्थानिक पोलिसांकडून प्रभावी कारवाई होत नसल्यामुळे या धंद्यांना अभय मिळत असल्याचा आरोपही महिलांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी विशेष पथकाची नियुक्ती करून अभोणा पोलिस ठाणे हद्दीतील अवैध मटका, जुगार, गुटखा विक्री आणि इतर अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आदिवासी महिलांनी केली आहे.
अभोणा ठाण्याची हद्द गुजरात राज्याच्या सीमेलगत असल्यामुळे सापुतारा, हतगड, गडकूल, श्यामगव्हाणमार्गे बोळकी पाडा परिसरातून कळवण तालुक्यात अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या तस्करीवर नियंत्रण नसल्यामुळे तस्करांचे धाडस वाढल्याचा दावा आहे. संबंधित यंत्रणेने या मार्गावरील वाहतुकीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.