

नाशिक: पुढारी वृत्तसेवा
इन्सुलिन हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे हॉर्मोन आहे. मात्र, ते शरीरासाठी 'हिरो' ठरणार की 'व्हिलन', हे आपल्या आहार, जीवनशैली आणि वर्तनावर अवलंबून असते. त्यामुळे सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार आवश्यक आहे. अन्नाचा वास घेतला किंवा त्याचा विचार केला तरी शरीरात इन्सुलिनची निर्मिती सुरू होते. त्यामुळे रुचकर पण आरोग्यदायी आहार घेणे आवश्यक असल्याचा सूर 'इन्सुलिनबाबत समज-गैरसमज' परिसंवादात उमटला.
गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यास संकुल येथे संस्कृती वैभव आणि 'मैत्र जीवाचे फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने 'इन्सुलिन - समज आणि गैरसमज' या विषयावर रविवारी (दि. ६) परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
या परिसंवादात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नितीन घैसास, ज्येष्ठ फिजिशियन डॉ. विजय घाटगे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत संकलेचा आणि जीवनशैली मार्गदर्शक डॉ. विनिता देशपांडे यांनी परिसंवादात मार्गदर्शन केले. नंदन दीक्षित यांनी परिसंवादाचे संचालन केले. यावेळी परिसंवादात सहभागी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, इन्सुलिन हे शरीरातील अत्यंत महत्त्वाचे हॉर्मोन असून, त्याबाबत समाजात असलेल्या विविध समज-गैरसमजांमुळे अनेकदा रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होतो.
इन्सुलिनचे शरीरातील महत्त्व, त्याचे संतुलन, दैनंदिन जीवनशैलीत आवश्यक बदल याबाबत तज्ज्ञांनी सविस्तर माहिती दिली. इन्सुलिनविषयी असलेल्या गैरसमजांवर प्रकाश टाकत तज्ज्ञांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य माहिती जाणून घेण्याचे आवाहन केले.
संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य जीवनशैलीचा आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणामही त्यांनी अधोरेखित केला. यावेळी संस्कृती वैभवचे रवींद्र देवधर, महेश विसाळ, अभिजित पुराणिक, वृषाली केळकर, किशोरी किणीकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.