

Ideal Gram Sevika Dr. Swati Deore's entry into acting
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बागलाण तालुक्यातील सारदे येथील आणि निफाड तालुक्यातील उमरखेड येथील आदर्श ग्रामसेविका पुरस्कार पटकावलेल्या डॉ. स्वाती गमनराव देवरे यांनी कुटुंब आणि शासकीय सेवा सांभाळत आतापर्यंत 'मिसेस आशिया' होण्याचा मान मिळवून जिल्ह्यासह तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
आता डॉ. देवरे यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. श्री स्वामी समर्थ यांच्या कार्यावर आधारित अल्बममध्ये डॉ. स्वाती यांनी गावातील विवाहित महिलेची उत्कृष्ट भूमिका सादर करत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
डॉ. स्वाती यांना वडील गमनराव शिस्त, देवरे यांच्याकडून वक्तशीरपणाचे, हजरजबाबीपणाचे बाळकडू मिळाले आहेत. लहानपणापासूनच स्वाती यांना अभिनय, मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा होती परंतु घरातील शिस्तीमुळे त्या शासकीय सेवेत दाखल झाल्या.
शासनाचा ग्रामसेविका म्हणून त्यांनी आदिवासी आणि बिगर आदिवासी भागात उत्कृष्ट कार्य केले. त्याबद्दल त्यांना राज्य पुरस्कारदेखील मिळाला. कुटुंब, शासकीय नोकरीला परिपूर्ण न्याय देत त्यांनी मिसेस आशिया इंटरनॅशनल हा पुरस्कारदेखील मिळाला आहे. अभिनयातदेखील त्यांना विशेष रुची आहे, त्यामुळेच त्यांनी अल्बममध्ये काम केले आहे.