

Shocking information from Minister Mahajan in the honey trap case
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोणीतरी हॉटेलवाला आहे, त्याने रूममध्ये कॅमेरे बसविले आहेत. तो त्या ठिकाणी राजपत्रित अधिकाऱ्यांना बोलावतो. काही मंत्री आणि आमदारांची नावेही समोर आली आहेत. त्याच्याकडे सीडी असेल, रेकॉर्डिंग असेल तर एकदाचा खुलासा होऊन जाऊ द्या ना, हॉटेलवाला कोण आहे हे सर्वश्रुत आहे, अशी धक्कादायक माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.
राज्यभरात नाशिकमधील हनी ट्रॅपचे प्रकरण गाजत असतानाच, जळगावमध्येही हनी ट्रॅपचा प्रकार समोर आल्याने अनेक बडे राजकारणी चर्चेत आले आहेत. त्यामुळे नाशिक आणि जळगाव हनी ट्रॅप प्रकरणी राजकारण्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या बेछूट फैरी झाडल्या जात असल्याने, हनी ट्रॅपबाबत आता सर्वसामान्यांमध्येही चर्चा रंगत आहे. नाशिकमधील हनी ट्रॅपबाबत आतापर्यंत अनेक विनाआधार धक्कादायक खुलासे चर्चिले गेले.
दररोज नवीन माहिती समोर येत असल्याने, हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती वाढतच आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना धक्कादायक माहिती दिली आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ना हनी आहे, ना ट्रॅप आहे' असा विधिमंडळात खुलासा केल्यानंतरही मंत्री महाजन यांनी केलेले विधान विरोधकांना संधी देणारे ठरत आहे.
मंत्री महाजन म्हणाले, नाशिकमध्ये कोणीतरी हॉटेलवाला आहे त्याने रूममध्ये कॅमेरे बसवून ठेवले आहेत. अनेक राजपत्रित अधिकारी, नेत्यांना, आजी-माजी आमदारांना तो त्या ठिकाणी बोलवतो. मला असे वाटते की, त्याबाबत खुलासा होऊन जाऊ द्या. त्याच्याकडे असलेली सीडी असेल, रेकॉर्डिंग असेल ते बघितले पाहिजे. हॉटेलवाला सर्वश्रुत आहे. त्याने काय व्हिडिओ काढले ते पुढे येऊ द्या, माझे खुले आव्हान आहे, असेही ते म्हणाले. मंत्री महाजन यांच्या या नव्या माहितीमुळे पुन्हा एकदा हनी ट्रॅप प्रकरणाची चर्चा जोर धरू लागली आहे.
हनी ट्रॅप प्रकरणी झालेले आर्थिक व्यवहार तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. शरणपूर येथील एका ट्रस्टच्या प्रकरणात अनेक जणांवर गुन्हे दाखल झाले असून, हे प्रकरणदेखील हनी ट्रॅपशी जोडले जात आहे. त्यामुळे अनेक व्यवहारांची चौकशी करतानाच जमिनीचे व्यवहार करणे अडचणीत येण्याची शक्यता आहे.