

पिंपळनेर पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील रामनगरात घरगुती वादातून पतीने थेट सासरी येऊन पत्नीवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. पतीचा पत्नीशी वाद सुरू असल्याने पतीने हे टोकाचे पाऊल उचलत पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. सध्या गंभीर जखमी झालेली पत्नी मृत्यूशी झुंज देत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साक्री तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील मळगाव येथील रहिवासी गोरख महाले याचा विवाह पिंपळनेर येथील टेंभा रोडवरील रामनगरात राहणारी यशोदा (वय २५) हिच्यासोबत झाला होता. त्यांना एक वर्षांचा मुलगाही आहे.
मात्र, दोघांमध्ये वितुष्ट आल्याने यशोदा ही पिंपळनेरात आई-वडिलांकडे राहत आहे. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास पती गोरख हा पिंपळनेर शहरातील रामनगर येथील घरात आला. पत्नीला घरात एकटे गाठून त्याने तिच्यावर धारदार कोयतासदृश हत्याराने वार केले. यात तिच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाची जखम झाली आहे.
हल्ल्यानंतर गोरखने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच साक्रीचे डीवायएसपी संजय बांबळे, सपोनी किरण बर्गे व पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. दरम्यान, आरोपी गोरख महाले हा दुचाकीवरून पसार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
हल्ल्यात यशोदा ही गंभीररीत्या जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी धुळे जिल्ह्यात रवाना करण्यात आले. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.