

Huge crowd of farmers at 'Krishithon'
नाशिक : पुढारी वृत्तसेवा वेलीला लटकलेली तब्बल दीड फुटाची चवळी, चमकदार दंडगोलाकार वालाची शेंग, झाडावर लोंबकळणारी हिरवीगार कारली, जांभळ्या व काळ्या रंगाची लटकलेली वांगी, बाजूलाच एकसमान आकाराचे टोमॅटो, कोथिंबीर, पिवळीधम्मक झेंडूची फुले अशी तब्बल ४० हून अधिक पिके तीही एकाच ठिकाणी उपलब्ध केल्यामुळे त्याचे निरीक्षण करण्यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी कृषीथॉनमध्ये गर्दी केली होती. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनीदेखील प्रदर्शनाला भेट देत विविध पिकांची माहिती घेतली.
ठक्कर डोम येथे आयोजित कृषीथॉन प्रदर्शनात उपलब्ध करून दिलेल्या मळ्यांसाठी मागील तीन महिन्यांपासून परिश्रम घेतले जात आहेत. आता मळ्यातील विविध फळभाज्या प्रदर्शनात येणाऱ्यांना आकर्षित करत आहेत.
४० हून अधिक भाजीपाल्यांच्या वाणांचे थेट रोपण, कीड व रोग व्यवस्थापन तसेच मशागत तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहता येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतील प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन मिळत आहे.
या मळ्यात कोबी, भेंडी, टोमॅटो, वाल, कारले, दोडका, कोथिंबीर, भोपळा, काकडी, चवळी, झेंडू या पिकांचा समावेश आहे. यांच्या बिया संकरित आहेत. त्या संशोधित असल्याने त्यांचे पीक नेहमीपेक्षा दीर्घकाळ चालते. विपरीत हवामानातही तग धरते. शिवाय भरघोस उत्पन्न मिळते. प्रदर्शनाचा समारोप सोमवारी (दि. १७) होणार असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांनी प्रदर्शनास भेट देऊन माहिती घ्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
३०० हून अधिक कंपन्यांचा सहभाग
कृषीथॉनमध्ये देशासह परदेशातील ३०० हून अधिक कृषी कंपन्या आणि संस्था सहभागी आहेत. यात कृषी निविष्ठा उत्पादक, बियाणे कंपन्या, कृषी अवजारे उत्पादक, ट्रॅक्टर व सिंचन कंपन्या, फवारणी यंत्रे उत्पादक, बँका, विमा कंपन्या, कृषी संशोधन केंद्रे, रोपवाटिका, अन्नप्रक्रिया उद्योग आणि विविध शासकीय विभागांचा सहभाग आहे. शेतकरी, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने भेट देत प्रदर्शनाची माहिती घेत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे ट्रॅक्टर पाहिले, तेव्हा त्यांना कंपनीने ट्रॅक्टरची छोटेखानी प्रतिकृती भेट दिली. हे प्रदर्शन शेतकऱ्यांसह कृषी क्षेत्रातील सर्व घटकांना उपयुक्त असल्याचे सांगितले.