

Alliance where possible, otherwise friendly competition
नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील नगर परिषदा निवडणुकांसाठी आम्ही सर्व ठिकाणी एबी फॉर्म दिले आहेत. या निवडणुकीत महायुती झाली तर मित्रपक्षांना सुटलेल्या जागांवरील आम्ही दिलेले एबी फॉर्म परत घेऊ असे सांगत, शक्य तिथे युती आणि शक्य नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढत होईल अशी आमच्या पक्षाची भूमिका असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. देशात आणि राज्यात आता काँग्रेस अस्तित्वात राहिलेली नाही आता ती दुर्बिणीने शोधावी लागेल असा टोलाही शिरसाट यांनी लगावला आहे.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या मंत्री शिरसाट यांनी शनिवारी (दि.१५) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीवर भाष्य करताना काँग्रेसवर टीकास्त्र डागले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शक्यतो महायुतीतूनच लढण्याच्या सूचना तीनही पक्षाच्या नेत्यांनी दिल्या आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी महायुती मध्ये लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या निर्णयाचा आदर राखत आम्ही पण युतीमध्ये लढण्याचे सांगत आहेत. त्यामुळे मित्रपक्षाशी चर्चा सुरू आहे; परंतु, तरीही मित्र पक्षांनी ऐकले नाही तर तिथे मैत्रीपूर्ण लढत करू, असेही शिरसाट यांनी यावेळी स्पष्ट केले. नाशिक महापालिकेवर आम्हाला महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे असा दावाही शिरसाट यांनी केला. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असून कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचे प्रयत्न आहेत. आम्हाला आमची ताकद माहित असल्याने आम्हाला कोणी लक्ष करू शकत नसल्याचेही शिरसाट यांनी बोलतांना स्पष्ट केले.
आम्हाला कोणी गृहीत धरू नये! नाशिक हे आमचे आवडते शहर असून त्याकडे आमचे लक्ष आहे. गिरीश महाजन हे कुंभमेळ्यासाठी आलेले असून ते संकटमोचक आहेत. त्यामुळे जिथे संकट असते ते तिकडे जातात असे सांगत याचा अर्थ आम्ही गप्प बसलेलो नाहीत, असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी भाजपला दिला आहे. निवडणुकीत अतिआत्मविश्वास दाखवणे योग्य नाही. त्याऐवजी महायुती म्हणून लढलो तर विजय निश्चित आहे. परंतु, आम्हाला कोणी गृहीत धरावे आणि चालावे असे नसून आम्हीही रणनिती आखल्याचे त्यांनी सांगितले.