

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर येथे एकमेव भारत गॅस वितरण एजन्सीने घरपोच सेवा बंद केल्याने ग्राहकांना जादा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. सोबत सिलिंडर रिफिल करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सात-सात तास रांगेत ताटकळावे लागत असल्याची परिस्थिती आहे.
त्र्यंबकेश्वर शहरात नाशिक येथून येणारे गॅस सिलिंडर ग्राहकांना घरपोच सेवा देत आहेत. मात्र, त्र्यंबकेश्वर शहरात असलेल्या भारत गॅस वितरणाची सेवा ग्राहकांच्या त्रासात भर घालणारी ठरत आहे. मागच्या काही महिन्यांपासून घरपोच सेवा बंद केली आहे.
सिलिंडर मिळाल्यापासून रिफिलसाठी ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागते. त्यानंतर बुकिंग स्वीकारली जाते. तथापि रिफिल सिलिंडर प्रत्यक्ष केव्हा मिळेल, याची शाश्वती नाही. बुकिंग केलेले आणि रिफिल सिलिंडर मिळेल, या आशेने ग्राहक सकाळपासून गावाबाहेर २ किमी अंतरावर रिकामे सिलिंडर घेऊन जातात.
नाशिक येथून सिलिंडर घेऊन येणारे वाहन केव्हा पोहोचेल याचा नेम नसतो. दरम्यान, ग्राहकांच्या रांगा लागलेल्या असतात. भरपावसात ग्राहक उभे राहतात. सकाळी ९ ला रांगेत उभ्या ग्राहकाला दुपारी ४ नंतर रिफिल सिलिंडर मिळते.
अनेक वेळा नाशिक येथून गाडी आली नाही या कारणास्तव रिकामे सिलिंडर घेऊन माघारी परातावे लागते. रिफिल सिलिंडर मिळवताना वितरण एजन्सीच्या कार्यालयामागे ७०० ते ८०० मीटर अंतरावर गोदाम आहे. तिथे जाण्याचा रस्ता खड्डे आणि गाळाने भरलेला आहे.
गोदामातून सिलिंडर घेऊन येण्याचे जादा पैसे मोजावे लागतात. त्यासाठी ३०० ते ५०० रुपये जास्तीचा खर्च येतो. रिफिल सिलिंडर मिळाले नाही तर भुर्दंड सोसावा लागतो आणि मनस्तापही होतो. ग्रामीण भागातून येणारे ग्राहक वैतागले आहेत.
यासाठी काही ग्राहकांनी सातपूर येथील वितरकांकडे आपले खाते बदलून घेतले आहे. विशेष म्हणजे त्यांना भारत गॅसचे रिफिल सिलिंडर विनातक्रार घरपोच मिळत आहे. गुरुवारी त्र्यंबकेश्वरमधील काही ग्राहकांनी तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागाकडे याबाबत निवेदन दिले आहे.