

नाशिक : विकास गामणे
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांची संकल्पना असलेला 'पोषणदूत' पॅटर्न आणि प्रशासनाच्या 'धडक मोहिमे'मुळे नाशिक जिल्हा कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. फेब्रुवारी महिन्यात राबवलेल्या धडक मोहिमेत आढळलेली ५३३ कुपोषित बालके, जूनमधील पुनर्तपासणीत थेट ४२९ वर आली आहेत.
या दोन्ही उपक्रमांचा प्रभावी मेळ असल्यामुळे अवघ्या चार महिन्यांत १०४ बालकांना कुपोषणाच्या चक्रातून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. विशेष म्हणजे, ज्या आदिवासी भागात कुपोषणाचे सावट अधिक गडद मानले जात होते, तिथेच बालकांच्या आरोग्यात झपाट्याने सुधारणा होत असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे.
पेठ, सुरगाणा, कळवण, त्र्यंबकेश्वर, देवळा, बागलाण आणि इगतपुरी या आदिवासी व दुर्गम तालुक्यांतील कुपोषण नाशिक जिल्ह्यासाठी दीर्घकाळापासून चिंतेचा विषय ठरले आहे. ओमकार पवार यांनी मात्र, कोणत्याही अतिरिक्त निधीशिवाय, उपलब्ध यंत्रणेतूनच 'पोषणदूत' उपक्रम सुरू केला.
या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी ० ते ५ वयोगटातील कुपोषित बालकांना दत्तक घेत त्यांच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. अधिकारी दरमहा प्रत्यक्ष भेट देत औषधे, सकस आहार आणि आवश्यकतेनुसार पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या सक्रियतेमुळे स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणाही अधिक सतर्क झाली आहे. नोडल अधिकाऱ्यांद्वारे होणाऱ्या साप्ताहिक आढाव्यामुळे हा उपक्रम अल्पवधीतच अत्यंत यशस्वी ठरत आहे. या उपक्रमाला भक्कम जोड देण्यासाठी ओमकार पवार यांच्या थेट निर्देशानुसार महिला व बालविकास विभागाने संपूर्ण जिल्ह्यात विशेष धडक मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेत प्रामुख्याने अतितीव्र कुपोषित (सॅम) आणि मध्यम कुपोषित (मॅम) बालकांचा शोध घेऊन त्यांची संपूर्ण माहिती डिजिटल व प्रत्यक्ष प्रणालीद्वारे नियमित 'ट्रॅक' केली जात आहे. केवळ बालकांचा शोध न घेता, त्यांच्या आरोग्यात सुधारणा होईपर्यंत त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. जि. प. महिला बालकल्याण विभागांतर्गत जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी प्रताप पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि. २८ एप्रिल ते १० मे तसेच १५ जून ते ३० जूनदरम्यान धडक मोहीम राबवण्यात आली.
१) नियमित वजन व आहार मार्गदर्शन : अंगणवाड्यांद्वारे दरमहा बालकांचे वजन करून त्यांच्या वाढीवर लक्ष ठेवले जाते व पालकांना आहाराबाबत मार्गदर्शन.
२) अंडी आणि अतिरिक्त पोषण आहार : बालकांमधील प्रथिनांची कमतरता भरून काढण्यास त्यांना नियमित अंडी व उष्मांकयुक्त अतिरिक्त आहार.
३) पोषण पुनर्वसन केंद्र : अतिकुपोषित बालकांना १४ दिवस केंद्रात दाखल करत डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार व विशेष पोषण.
४) मजुरी बुडीत भरपाई : केंद्रातील १४ दिवसांच्या उपचारादरम्यान पालकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनाकडून दररोज ३०० रुपये रोजगार बुडीत भत्ता.
५) डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना : कुपोषण मुळापासून हटवण्यासाठी गरोदर व स्तनदा मातांना प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर पोषक आहार.