

येवला : येवल्यातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे आता अवजड वाहने, वाळू, मुरूम नेणारे डंपर, टेम्पो, ट्रक, बसने पर्यायी मार्ग शोधत आपली वाहतूक वसाहत भागातील सुरू केल्यामुळे शाळकरी मुलांसह नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. ही वाहतूक समस्या गंभीर बाब बनली आहे.
येवला पोलिस प्रशासनाला सुलभानगर - हुडको कॉलनी परिसरातील नागरिकांच्या जीवाची पर्वा आहे का, असा संतप्त प्रश्न येथील नागरिक करत आहेत. शाळकरी विद्यार्थी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असणारा वसाहत भाग आहे. शिवाय रस्ते लहान आहेत. कॉलनी भागातील रस्त्यावरून आता अवजड वाहने, वाळू, मुरूम नेणारे डंपर, टेम्पो, ट्रक, बस वाहतूक सुरू झाली आहे. नागरी वसाहत असणाऱ्या हुडको, सुलभानगर येथील कॉलनी रोडमार्गे, पारेगाव रोड, विंचूर रोड आणि नगर- मनमाड हायवे ही वाहतूक होत आहे.
यामुळे वसाहत भागातील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. ही वाहतूक समस्या गंभीर बाब बनली आहे. यावर पोलिस प्रशासनाने तातडीने ही अवजड वाहतूक वसाहत भागातून रोखावी. वसाहत भागातील रस्त्याची बांधणी अवजड वाहनासाठी नाही. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाल्यास त्याचा त्रासही स्थानिक नागरिकांना सोसावा लागणार आहे.
जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण?
फत्ते बुरुजनाका, विंचूर चौफुली वाहतूक कोंडीमुळे वाहतूक आता वसाहत भागातून जात आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. वसाहत भागातून वाहतूक सुरू झाल्यामुळे एखादा मोठा अपघात घडला आणि त्यात जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेईल. सामान्य नागरिक आंदोलन करतील अर्ज देतील आणि मग प्रशासनाला जाग येईल याची वाट पाहू नये. प्रशासनाने वेळीच सजग होत अवजड वाहतुकीवर निर्बंध आणावे, अशी मागणी वसाहत भागातील सामान्य नागरिक करत आहेत.
येवला शहरातील नागरी वस्तीतून होणाऱ्या अवजड वजनाच्या वाहतुकीने वसाहत भागात प्रदूषण वाढले आहे. यामुळे अपघातांची शक्यताही वाढली आहे. वसाहत भागातील रस्तेही या वाहतुकीने लवकर खराब होण्याची शक्यता आहे.
विश्वास जाधव, येवला