

नाशिक : रस्त्यासाठी वापरण्यात येत असलेली खडी, मुरूम व इतर साहित्याची पाहणी करत त्यांचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी नमुने घेतले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच संबंधित कंत्राटदारांचे अभियंत्यासमोर काही साहित्याचे मटेरियल टेस्टिंग व्हॅनमार्फत तपासणी, तपासणीचे अहवाल तातडीने मागवण्याच्या सूचना देत विभागीय आयुक्त गेडाम यांनी कामांच्या गुणवत्तेची प्रत्यक्ष तपासणी केली.
त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून पायाभूत सोयी सुविधांची कामे सुरू करण्यात आलेली आहेत. या कामांचा आढावा घेण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कामांना भेटी देऊन कामाची गती व गुणवत्तेची पाहणी केली. जिल्ह्यात कुंभमेळ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात येत असून, या कामांना गती देण्यासाठी आणि कामांचे संनियंत्रण करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.
प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गेडाम यांनी सर्व यंत्रणांना कामांच्या गुणवत्तेबाबत विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत. या पार्श्वभूमीवर वाडीवऱ्हे येथे बेलगाव कुऱ्हे-नांदुरवैद्य - साकूर फाटा मार्गाची पाहणी केली. त्यांच्यासमवेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे होते. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त विविध विभागांमार्फत करण्यात येत असलेल्या रस्ते, पूल, घाट व इतर कोणत्याही कामात नियमानुसार आवश्यक तो दर्जा असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंहस्थानिमित्त कोट्यवधी भाविक जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी आवश्यक पायाभूत सोयी सुविधा, दळण - वळणाच्या साधनांची उपलब्धता राज्य शासन कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करत आहे. प्राधिकरणाच्या माध्यमातून आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्चाच्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यात जिल्ह्यातील रस्ते कामांचाही मोठा समावेश आहे.
भाविकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी रस्त्यांची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झालीच पाहिजे, यासाठी या कामांची संबंधित विभागामार्फत दैनंदिन देखरेख करणे आवश्यक आहे. कामाच्या टप्प्यानुसार होत असलेल्या कामांचे छायाचित्र तसेच छायाचित्रण करण्याच्याही सूचना यंत्रणांना देण्यात आल्या.