

विशेष प्रतिनिधी
नांदेड ः मुखेडसारख्या मागास तालुक्यात 35 वर्षांहून अधिक काळ वैद्यकीय सेवा देतानाच सर्पदंशावरील उपचारासाठी देशभर विख्यात झालेल्या डॉ.दिलीप पांडुरंगराव पुंडे यांना येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात होणाऱ्या ‘रिसेप्शन ॲट होम’ या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. देशभरातील केवळ 12 निमंत्रित डॉक्टरांमध्ये त्यांचा समावेश आहे.
राष्ट्रपती भवनाचे हे विशेष निमंत्रण नांदेडच्या मुख्य डाकघर कार्यालयातील अधिकारी अरुण गायकवाड यांनी डॉ.पुंडे यांना मुखेड येथे जाऊन सुपूर्द केले. निमंत्रित डॉक्टरांमध्ये ग्रामीण भागातून केवळ डॉ.पुंडे यांचा समावेश असल्याचे उपलब्ध झालेल्या यादीवरून दिसून आले. मुंबईतील डॉ.नीता राजीव वर्टी यांचाही त्यात समावेश आहे. इतर 10 डॉक्टर्स देशाच्या विविध भागांतील असल्याचे दिसून आले.
डॉ.पुंडे यांचे शालेय शिक्षण छ.संभाजीनगरातील विद्यानिकेतनमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये झाले. नंतर वैद्यकीय शाखेतील पदव्युत्तर पदवी त्यांनी तेथील वैद्यकीय महाविद्यालयातून प्राप्त केली. डॉ.आर.बी.भागवत, डॉ.नंदकुमार उक्कडगावकर हे नामांकित प्राध्यापक त्यांना लाभले. उच्च शिक्षणानंतर शहरी भागात वैद्यकीय व्यवसायाची संधी असतानाही तेव्हा अतिमागास असलेल्या मुखेडसारख्या डोंगराळ भागात त्यांनी आपली आरोग्यसेवा सुरू केली. आधी त्यांनी ग्रामीण रुग्णालयात शासकीय नोकरी केली. मागील 30 वर्षांपासून ते तेथेच स्वतंत्र वैद्यक व्यवसाय करत आहेत.
सर्प किंवा विंचूदंश झालेल्या रुग्णांना जीवदान देण्याच्या बाबतीत कोकणात जे कार्य डॉ.हिंमतराव बावस्कर यांनी केले, तसेच कार्य डॉ.पुंडे यांनी मुखेड येथे केले. 1988 साली त्या भागात सर्पदंशाचा मृत्यूदर 25 टक्के होता; पण डॉ.पुंडे यांनी तो आता शून्य टक्क्यांवर आणला आहे. उपचारासोबतच त्यांनी जनजागृती केली. रुग्णांचा मृत्यू टाळण्यासाठी सोपे उपाय अमलात आणले. त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन राष्ट्रीय सर्पदंश मार्गदर्शन समितीत सदस्य म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला. तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेही त्यांच्या या कार्याची नोंद घेतली आहे.
राष्ट्रपती भवनाच्या वरील कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका अत्यंत आकर्षक, कल्पक आणि लक्षवेधी आणि कायमस्वरूपी संग्रही ठेवावी अशा स्वरूपाची आहे. हस्तकलेचा उत्तम नमुना या पत्रिकेतून बघायला मिळतो. या पत्रिकेत इंडिया शब्द न वापरता ‘द प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. हे निमंत्रण मिळाल्यानंतर हा माझ्या एकट्याचा सन्मान नसून आई-वडिलांचे आशीर्वाद, पत्नी माला पुंडे हिची साथ आणि माझ्या रुग्णालयातील सर्व सहकारी आणि हजारो रुग्णांचा हा सन्मान आहे, अशी कृतज्ञ भावना डॉ.पुंडे यांनी व्यक्त केली.