Hartalika And Ganesh Chaturthi | 14 सप्टेंबरला दुर्मिळ योग! हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी; पूजेची वेळ अन् मुहूर्त जाहीर

Hartalika And Ganesh Chaturthi | हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी
Ganesh Chaturthi
Ganesh Chaturthi AI Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भाद्रपद शुद्ध तृतीया आणि चतुर्थीच्या तिथीच्या गणितामुळे यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी हे दोन्ही सण सोमवारी (दि. १४) एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे सकाळी हरतालिकेची पूजा आणि त्यानंतर गणेशाची स्थापना करण्याचा दुर्मिळ योग भाविकांना साधता येणार असल्याचे श्रीमहंत सुधीरदास पुजारी यांनी सांगितले.

Ganesh Chaturthi
Nashik Police | नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 402 उपद्रवींवर हद्दपारीचा बडगा

भाद्रपद शुद्ध तृतीया तिथी रविवारी (दि. १३) सकाळी ७.०८ वाजता सुरू होऊन, सोमवारी (दि. १४) सकाळी ७.०६ वाजता समाप्त होत आहे. त्यानंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थी सुरू होत आहे. हरतालिका व्रतासाठी सूर्योदयावेळी तृतीया तिथी असणे, तर गणेश चतुर्थीसाठी मध्यान्हकाळी चतुर्थी तिथी असणे महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे यंदा दोन्ही सण सोमवारी (दि. १४) आले आहेत.

हरतालिकेनंतर गणेशस्थापना

महिलांना सकाळी लवकर हरतालिकेची मातीची शिवलिंगे तयार करून शिव-पार्वतीची पूजा करता येईल. त्यानंतर गणेशाची स्थापना व पूजाविधी करता येईल. त्यामुळे यंदा एकाच दिवशी शिव-पार्वती आणि प्रथम पूज्य गणरायाची आराधना करण्याची संधी मिळणार आहे.

पूजा मुहूर्त

पंचांगानुसार हरतालिकेसाठी प्रातःकालीन पूजा मुहूर्त सकाळी ६.०५ ते ७.०६ असा आहे. याशिवाय ब्रह्म मुहूर्त पहाटे ४.३२ ते ५.१९, तर अभिजित मुहूर्त सकाळी ११.५२ ते दुपारी १२.४१ असा आहे. स्थानिक सूर्योदयाच्या वेळेनुसार या वेळात काहीसा फरक होऊ शकतो.

हरतालिका पूजेचा संभ्रम दूर

तृतीया तिथी सकाळी ७.०६ ला संपत असल्यामुळे हरतालिकेची पूजा त्यापूर्वीच करावी लागेल, असा संभ्रम अनेक महिलांमध्ये झाला आहे. मात्र, तिथीचा उपयोग प्रामुख्याने व्रताचा दिवस निश्चित करण्यासाठी केला जातो. पूजेची वेळ केवळ तिथी संपण्याच्या वेळेशी बांधलेली नाही, असे श्रीमहंत सुधीरदास महाराज यांनी स्पष्ट केले.

सूर्योदयावेळी तृतीया असल्यामुळे दि. १४ सप्टेंबर हा व्रताचा दिवस ठरतो. तृतीया त्याआधीच समाप्त झाली असली तरी पूजा केली पाहिजे, असा नियम नाही. ब्रह्म मुहूर्तापासून दुपारपर्यंत उपलब्ध शुभ मुहूर्तानुसार पूजा करता येते. यंदाचा शिव-पार्वती आणि पूज्य गणपतीच्या आराधनेचा योग दुर्मिळ आहे.

- श्रीमहंत सुधीरदास महाराज

गणेशोत्सव १२ दिवसांचा; तयारी अंतिम टप्प्यात

यंदाचा गणेशोत्सव १२ दिवसांचा होणार असल्यामुळे गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गणरायाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंतचा कालावधी वाढल्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणेशोत्सवाच्या तयारीलाही वेग आला आहे. विविध मंडळांनी यंदाच्या उत्सवासाठी आकर्षक देखावे, सामाजिक संदेश देणारे उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नियोजनाची जय्यत तयारी केली आहे.

सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनातील महत्त्वाचा गणेशोत्सव यंदा १२ दिवसांचा असल्यामुळे गणेश मंडळांना विविध उपक्रम राबवण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. त्यानुसार मंडळांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. वर्गणी संकलन, मंडप उभारणी, रोषणाई, सजावट आणि देखाव्यांच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. सोमवारी (दि. १४) गणेश चतुर्थी असून, मध्यान्हानंतर बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास ज्योतिषाचार्यांनी सांगितले आहे.

घरघरी गणेशोत्सवाची धूम

गणेशभक्तांच्या घरोघरी बाप्पा विराजमान झाल्यानंतर दीड, तीन, पाच किंवा सात दिवस, तर काही कुटुंबांमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो. काहींकडे गौरी-महालक्ष्मीसह गणपती विसर्जनाची परंपरा असते.नागरिकांकडून तयारी केली जात आहे. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना भाविकांकडून विशेष पसंती दिली जात आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून नैसर्गिक सजावटीला प्राधान्य देणाऱ्या नागरिकांचा कल वाढत आहे.

सामाजिक प्रबोधन, रक्तदान, आरोग्य तपासणी, वृक्षरोपण, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर अनेक मंडळांचा भर राहणार आहे. एकूणच १२ दिवसांच्या गणेशोत्सवामुळे यंदा शहरातील उत्साहाचे स्वरूप अधिक व्यापक होण्याची शक्यता असून, गणेशभक्तांमध्ये आतापासूनच 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष घुमत आहे.

पिंपळगाव नगर परिषदेतर्फे पर्यावरणपूरक आरास स्पर्धा

नगर परिषदेतर्फे यंदा पर्यावरणपूरक गौरी-महालक्ष्मी आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गौरी-महालक्ष्मी उत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचावा, घरगुती सजावटीत पर्यावरणपूरक साहित्याचा वापर वाढावा, या उद्देशाने ही स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेत पर्यावरणपूरक सजावट, प्लास्टिक व थर्मोकोलचा वापर टाळणे, पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा वापर, ध्वनिप्रदूषण बंदी, घरातील कचऱ्याचे वर्गीकरण, घरावर रेनवॉटर हार्वेस्टिंगची सुविधा तसेच वृक्षरोपण या बाबींना विशेष गुण देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकास ७ हजार १ रुपये, द्वितीय क्रमांकास ५ हजार १ रुपये, तृतीय क्रमांकास ३ हजार १ रुपये बक्षीस दिले जाणार आहे.

Ganesh Chaturthi
Nashik-Pune railway highway |नाशिक-पुणे रेल्वे महामार्ग वादात भुजबळांची उडी

सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन म्हणून स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल.
पर्यावरणपूरक सजावटीला प्रोत्साहन देतानाच गौरी-महालक्ष्मी उत्सव अधिक सुंदर, विधायक आणि पर्यावरणस्नेही करण्यासाठी नगराध्यक्ष डॉ. मनोज बडे, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, गटनेते नीलेश पाटील आणि मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचक्के यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
नोंदणीसाठी १६ पर्यंत मुदत

स्पर्धसाठी १० ते १६ सप्टेंबर या कालावधीत नोंदणी करता येईल. इच्छुकांनी पिंपळगाव बसवंत नगर परिषद अग्निशमन कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन नगर परिषदेने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news