

नाशिक : अंजली राऊत
होळी अन् मराठी नूतन वर्ष गुढीपाडव्याचा दिवस हा साडेतीन मुहतपैिकी एक मानला जातो. या दिवशी दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक असून, या दिवशी शुभकार्याला सुरुवात केली जाते. विशेषतः गुढीला लागणारा सव्वा फुटी हार ५० रुपयाला मिळत असे. परंतु, यंदा १०० रुपये म्हणजे दुप्पट भावाने बाजारात विक्रीस दाखल झाला आहे. यंदा गॅस तुटवड्याची झळ गुढीलादेखील बसली आहे.
ज्या ठिकाणी पूर्वी ४ टन मालाचे उत्पादन होत होते, तेथे आजच्या स्थितीत निव्वळ एक टन मालाचे उत्पादन झाल्याचे हार-कडे तयार करणारे कारागीर सांगत आहेत. गुढीपाडव्यासाठी फेब्रुवारीपासून दररोज ८०० किलो हार-कडे तयार होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मात्र, या व्यवसायात कारागिरांची घटलेली संख्या, वाढता उत्पादन खर्च यामुळे शहरातील रविवार कारंजा, गोदाघाट, शाहू महाराज चौक, सायखेडा आणि भगूर येथे केवळ चारच कारखाने सुरू आहेत. हार-कडे करण्याचा पारंपरिक व्यवसाय संकटात सापडला असून, कारागिरांची घटती संख्या प्रकषनि समोर येत आहे. होळी आणि गुढीपाडव्याच्या दिवशी पूजेसाठी हार-कड्यांचे महत्त्व आजही टिकून आहे. गेल्या काही वर्षांत हार-कडे पारंपरिक व्यवसायाला महागाईच्या झळा बसल्या आहेत.
पूर्वी शहरात ४० च्या जवळपास कारखाने बंद पडले असून, त्यातील चारच कारखाने सुरू आहेत. चारही कारखान्यांत प्रत्येकी १० ते १५ कारागिरांची टीम काम करत आहे. १ पोते हे ८० किलोंचे असून, साखरेचे हार-कडे हे १२० रुपये प्रतिकिलोप्रमाणे बाजारात दाखल आहेत. कारागिरांना एका पोत्यामागे ३ हजार रुपये मजुरी मोजावी लागत आहे.
एकीकडे कामगार खर्चात झालेली मोठी वाढ आणि दसरीकडे हार-कड्यांतून मिळणारा अत्यल्प नफा यामुळे अनेक कारखानदारांचा हा पारंपरिक व्यवसाय संकटात सापडला आहे. अशा प्रकारे तयार होतात हार-कडे साखर, पाणी, दूध पावडर किंवा दूध आणि लिंबू पावडर किंवा लिंबाच्या रसाचा वापर करून हार-कडे तयार केले जातात. सुरुवातीला मोठ्या कढईत आवश्यक त्या प्रमाणात पाणी आणि साखरेचे मिश्रण करून त्याची चासणी केली जाते. त्यानंतर या पाण्यात दूध पावडर किंवा दूध टाकून मिश्रण ढवळले जाते. त्यानंतर लिंबू पावडर किंवा लिंबाचा रस टाकला जातो.
हे मिश्रण लाकडी साच्यात दोरे टाकून ओतले जाते. या प्रक्रियेदरम्यानच खाद्य रंग वापरून रंगीत पाकळ्या करीत आकर्षक व चविष्ठ हार-कडे तयार केले जातात. हारांसाठी इंदूहून खाण्याचा रंग मागविला जातो. त्यात वाघनख आणि रंगीत पाकळ्यांचा समावेश असतो.
व्यवसायातील खर्च अन् नफा एक क्विंटल साखरेतून ९० किलो हार-कडे तयार होतात. त्यासाठी प्रतिक्विंटल ६ ते ७ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. त्या बदल्यात कारखानदारांना प्रतिकिलो १५ आणि क्लिंटलमागे साधारण १,५०० रुपयांपर्यंतचा नफा मिळतो. हंगामात ३० हजार रुपयांपर्यंत नफा होतो. सद्यःस्थितीत कारखान्यात तयार झालेले हार-कडे १२० रुपये किलो दराने विक्री होत आहे. किरकोळ बाजारात त्याची विक्री ३०० रुपये किलो दराने होत आहे.
हारांची विक्री ३० रुपयांपासून पुढे होत असून, यंदा दर १० टक्के वाढले आहेत. हारांसाठी असलेले पर्याय यंदा ६ व ९ इंचांचे कडे, १२, १८, २४ इंचांपासून ३ फूट लांबीपर्यंतचे हार तयार करण्यात आले आहेत. हार कड्यांसमवेत लग्नसराईसाठी लागणारे चित्रदेखील तयार करण्यात आले आहेत. ज्यात नारळ, विठू-रखुमाई मूर्ती, मंदिर, तुळस, हत्ती, घोडा, उंट, बदक अशा साखरेच्या विविध वस्तू ज्यासाठी कारागीर 'चित्र' असा उल्लेख करतात. तेदेखील यावेळी बाजारात उपलब्ध आहेत.
दरवर्षी होळी, गुढीपाडवा या सणांत चार टन हार-कडे तयार केले जात होते. इलेक्ट्रिक शेगडीचे भावदेखील वाढले आहेत. काही दिवसापासून गॅस तुटवडा भासत आहे. वेळेनुसार केवळ एक टन हार-कडे तयार करण्यात आले आहेत. परवडत नसले, तरी पिढ्यान्पिढ्यांपासून तसेच मी १७ वर्षे हा पारंपरिक व्यवसाय करत आहे. आमचे ठरलेले काही जुने ग्राहक असल्याने आजही कारखाना सुरू ठेवला.
-राजू परदेशी, कारखानदार