

ठळक मुद्दे
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही
महाराष्ट्रदिनी (1 मे) ध्वजारोहणाचा मान हा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना
भाजप - शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू
नाशिक : जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. सरकार स्थापन होऊन आठ महिने झाले असून, या दरम्यान आलेल्या प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) व महाराष्ट्रदिनी (1 मे) ध्वजारोहणाचा मान हा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आला होता. आता मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हेदेखील मंत्री झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे तीन मंत्री असल्यामुळे हा मान राष्ट्रवादीला मिळावा, अशी मागणी सुरू झाली आहे. त्यामुळे या स्वातंत्र्यदिनी नक्की ध्वजारोहण कोण करणार ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन आठ महिने झाले, तरीही नाशिकचे पालकमंत्रिपद निश्चित झालेले नाही. भाजप - शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असे सांगत, सर्वांकडून वेळ मारून नेली जाते, तर पालकमंत्री नियुक्त होईपर्यंत मुख्यमंत्री ही जबाबदारी निभवतात असे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.
परंतु, अद्यापही रायगड व नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. नाशिकच्या पालकमंत्री पदावर भाजपकडून दावा सांगण्यात येत आहे. त्यातून गिरीश महाजन यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ आणि अॅड. माणिकराव कोकाटे हे देखील या पदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जाते. याशिवाय शिंदे सेनेचे मंत्री दादा भुसे यांनीही या पदावर दावा केला आहे. आता येत्या 15 ऑगस्ट रोजी झेंडा फडकवण्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते दोनदा ध्वजारोहण झाले असल्यामुळे आता हा मान राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मिळावा, अशी मागणी राष्ट्रवादी गोटातून होत आहे. त्यातच, रायगड येथे राष्ट्रवादीला संधी मिळाल्यास नाशिकमध्ये शिवसेनेला संधी द्यावी, असा युक्तिवाद होऊ लागला आहे
दि. 15 ऑगस्ट रोजी रायगड आणि नाशिकमध्ये कोण पालकमंत्री म्हणून झेंडा फडकवणार, यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 26 जानेवारीप्रमाणेच या स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवला जाईल. पालकमंत्री पदाचा प्रश्न महायुतीसाठी मोठा नाही. तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. महायुतीत समन्वय असून सर्व काही आलबेल आहे, असेही भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.