

नाशिक : महायुतीतील मंत्रिपदावरून सुरू असलेली रस्सीखेच शमत असतानाच, पुन्हा एकदा महायुतीतील वातावरण पालक मंत्रीपदावरून तापले आहे. अशात नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या दौरा पत्रात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा उल्लेख पालकमंत्री म्हणून केल्याने, पालकमंत्री पदी कोकाटे यांची तर वर्णी लागली नाही ना? अशी जोरदार चर्चा रंगली आहे.
केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल हे शुक्रवारी (दि. २७) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्याबाबतचे दौरा पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेल्या या दौरा पत्रात कृषिमंत्री कोकाटे यांच्या स्वीय सहायकांना आदेशित करताना मंत्री कोकाटे यांचा 'कृषिमंत्री तथा पालकमंत्री' असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे मंत्री कोकाटे यांची पालकमंत्री पदी वर्णी तर लागली नाही ना? अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, पालकमंत्री पदावरून मंत्री कोकाटे हे पहिल्या दिवसापासून आग्रही असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक सात आमदार निवडून आल्याने, नाशिकचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीच्याच वाट्याला जावे, अशी मागणीही त्यांच्याकडून वेळोवेळी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री कोकाटे यांचा जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेल्या दौरा पत्रातच पालकमंत्री म्हणून उल्लेख असल्याने चर्चेला उधाण आले आहे.
कृषिमंत्री कोकाटे यांचा पालकमंत्री उल्लेख असलेले दौरा पत्र प्रसिद्ध होताच याबाबतचे वृत्त दूरचित्रवाणी वाहिन्यांवर झळकले. त्यामुळे काही क्षणांतच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दौरा पत्रात बदल करीत, सुधारित दौरा पत्रात कृषिमंत्री कोकाटे यांच्या नावासमोरील पालकमंत्री हा उल्लेख वगळण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा प्रकार अनावधानाने घडला असला, तरी कोकाटे समर्थकांमध्ये मात्र यामुळे चांगलाच हुरूप निर्माण झाला आहे.