

पुढारी ऑनलाइन डेस्क | नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. नाशिकमध्ये भाजपचे नेते गिरिश महाजन यांना पालकमंत्रीपद दिल्याने महायुतीत नाराजीनाट्य पाहायला मिळालं तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून वाद सुरु आहे. त्यामुळे राज्य सरकारने या दोन्ही जिल्ह्यांतील पालकमंत्रीपदाला स्थगिती देत मोठा निर्णय घेतला आहे.
शनिवारी पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली. यात नाशिकमध्ये व रायगडमध्ये पालकमंत्री पदावरुन वादाची ठिणगी पडली. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना पालकमंत्री केल्याने शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले नाराज झाले. तर नाशिकमध्ये दादा भुसे यांच्याऐवजी गिरीश महाजन यांची निवड करण्यावरून भाजप आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाले. तसेच अजित पवार गटाचाही गिरीश महाजन यांच्या नावाला विरोध होता. सर्वांधिक सात जागांवर आमदार निवडून आले असल्याने पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी पक्षाकडून दावा सांगितला जात होता. रायगड व नाशिक या दोन्ही जिल्ह्यांमधील पालकमंत्री पदाच्या निवडीला मोठ्या प्रमाणात विरोध आणि निदर्शने झाल्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
महायुतीमध्ये खातेवाटप जाहीर झाल्यानंतरही पालकमंत्रीपदाचा निर्णय बराच काळ रखडला होता. अखरे दिड महिना उलटून गेल्यानंतर १८ जानेवारीला राजी रात्री उशिरा पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली. त्यात पालकमंत्रीपदाचे वाटप करताना अनेक दिग्गज नेत्यांना डावलण्यात आल्याने नाराजी उफाळून आली आहे. रायगडमध्ये तर मोठा राडा देखील झाला. जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामूहिक राजीनामे दिले तसेच निषेध व्यक्त करण्यात आला. भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रिपद न दिल्यान शिवसैनिक आक्रमक झाले. तर नाशिकमध्येही दादा भुसे यांना डावलण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त झाली. दोनही जिल्ह्यात मोठे नाराजीनाट्य पाहायला मिळाले. त्यामुळे 19 जानेवारीला रात्री उशिरा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
पालकमंत्री पद डावलल्यांतर दादा भुसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, पालकमंत्रिपदी डावलणे अशातला काही भाग नाही. जी जबाबदारी दिली ती पुढे नेणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे काम असते. मला या ठिकाणी जी काही जबाबदारी दिली ती आम्ही पुढे नेऊ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संवाद साधून निर्णय घेतले आहेत. ते निर्णय पुढे नेणे आमची जबाबदारी आहे.