

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरकरांनी मंगळवारी (दि.६) दै. 'पुढारी'वर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केला. 'पुढारी'च्या मराठवाडा आवृत्तीने मंगळवारी ९ वर्षांची वाटचाल पूर्ण करून १० व्या वर्षात पदार्पण केले आहे. पुढारीचा हा वर्धापनदिन शहरवासीयांसाठी आनंदाची पर्वणी ठरला. यानिमित्ताने आयोजित स्नेहमेळाव्यात शहरवासीयांनी 'पुढारी'शी असलेले ऋणानुबंध अधिक दृढ केले.
क्रांती चौक परिसरातील हॉटेल मेनॉर लॉन्सवर सायंकाळी वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला. संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईने झगमगत होता. सायंकाळी सहा वाजेपासून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योग, क्रिडा, व्यापार, वैद्यकीय यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छांसाठी गर्दी केली होती.
दै. 'पुढारी'चे कार्यकारी संपादक विनोद काकडे, युनिट हेड अमोल कोल्हे आणि जाहिरात व्यवस्थापक अप्पासाहेब गोरे यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला. कार्यक्रमस्थळी रात्री १० वाजेनंतरही मान्यवरांची गर्दी कायम होती. यावेळी हिरवळीवर उपस्थित मान्यवरांची आपापसांत गप्पांची मैफल चांगलीच रंगली.
कॅबिनेट मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अब्दुल सत्तार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. अरविंद गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते, पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, शासकीय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. माया इंदूरकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक नामवंत व्यक्तींनी उपस्थित राहून दै. 'पुढारी'वर शुभेच्छांचा वर्षाव केला.