

पणजी : पुढारी वृत्तसेवा
आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असलेल्या गोव्यात देशी-विदेशी पर्यटकांना फिरण्यासाठी रेंट-अ-कार व रेंट-अ-बाईक सुविधा उपलब्ध आहेत. सरकार व परिवहन विभागाने काही अटी-शर्तीसह या सेर्वांना परवानगी दिली असली, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसत आहे. काही खासगी वाहनमालक परवानगीशिवाय गाड्या भाड्याने देत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
परिणामी, या सेवांवर अधिक कडक नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरत आहे. गेल्या काही वर्षांत रेंट-अ-कार आणि बाईक अपघातांमुळे मृत्यूंची संख्या सातत्याने वाढत आहे. अलीकडेच शिर्ली, साळगाव आणि शिवोली येथे झालेल्या अपघातांत तिधा निर्दोष नागरिकांचा बळी गेला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांच्या मते, भाड्याने घेतलेल्या वाहनांचे बेजबाबदारपणे व महाधुंद अवस्थेत चालवणे हे अपघातांचे प्रमुख कारण आहे.
परवाधारक आणि बेकायदेशीर वाहनांमध्ये फरक असला, तरी चालकांची बेपर्वाई हा समान धागा असल्याचे स्पष्ट होत आहे. वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२१ ते मार्च २०२६ या कालावधीत रेंट-अ कार अपघातांत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल २०२६ मध्ये राज्यात २१७ अपघात झाले असून त्यात २४ जणांचा मृत्यू झाला (दक्षिण गोव्यात १४, उत्तर गोव्यात १०), तर २२ जण गंभीर आणि ८९ जण किरकोळ जखमी झाले. मे २०२६ मध्ये १११ अपघात नोंदवले गेले असून त्यात तिघांचा मृत्यू झाला. ही आकडेवारी पाहता परिस्थिती किती गंभीर आहे, याची कल्पना येते.
स्थानिक रहिवासी आणि रेंट-अ कॅब असोसिएशनने पर्यटकांच्या बेजबाबदार व मद्यपी वाहनचालकांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी १ जुलैपासून राज्यभर २६ ठिकाणी एआय कॅमेरे बसवण्याची योजना आखण्यात आली आहे. तसेच सर्व भाड्याच्या गाड्यांमध्ये स्पीड गव्हर्नर बसवणे सक्तीचे करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
या उपाययोजनांमुळे अपघातांमध्ये काही प्रमाणात घट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संपूर्ण रेंट-अ-कार व बाईक योजनेचा सर्वंकष आढावा घेऊन त्यातील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. संबंधित हितधारकांना विश्वासात घेऊन सुधारणा केल्यासच या सेवांवर नियंत्रण ठेवता येईल. या सुधारणा २७ सप्टेंबर, जागतिक पर्यटन दिनापूर्वी पूर्ण करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. सरकारने वेळेत निर्णय घेतल्यासच पर्यटक आणि स्थानिक नागरिकांचा जीवित सुरक्षित राहू शकतो. आणि नियमांची माहिती देणे आवश्यक असतानाही अनेक ठिकाणी या बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे.
पर्यटकांना वाहन भाड्याने देताना त्यांच्या वाहन चालवण्याच्या क्षमतेची तपासणी, वैध परवाना पडताळणी काही पर्यटकांना स्थानिक वाहतूक नियमांची पुरेशी माहिती नसते, त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. याशिवाय हेल्मेट व सीटबेल्टचा वापर टाळणे, वेगमर्यादा ओलांडणे आणि मद्यपान करून वाहन चालवणे या प्रकारांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे केवळ नियम कडक करण्याबरोबरच जनजागृती मोहिमा राबवणेही तितकेच आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
ठोस उपाय आवश्यक...
गोवा कॅनचे समन्वयक रोलैंड मार्टिन्स यांनी सांगितले की, अपघातांची सखोल चौकशी परिवहन व वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे करणे आवश्यक आहे. तिन्ही जिल्ह्यांमधील माहिती गोळा करून चालकांचा अनुभव, मद्यपान, पूर्व इतिहास आणि नियमभंग यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. यावर आधारित ठोस उपाययोजना राबविल्यास रिस्थिती सुधारू शकते.
पाच महिन्यांत ४३ जणांचा मृत्यू
जानेवारी ते मे २०२६ या कालावधीत गोव्यात ५३६ अपघातांची नोंद झाली असून ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. गंभीर जखमींची संख्या २९ आहे. वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, सुमारे ९२ टक्के अपघात हे निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे झाले. भाड्याने दिल्या जाणाऱ्या गाड्यांमुळे होणारे अपघात आणि पर्यटकांकडून होणारे वाहतूक नियमांचे उल्लंघन ही राज्यातील गंभीर समस्या बनली आहे.