Sindhudurg News| इंधन दरवाढीने महागाईचा भडका

सामान्यांची होरपळ : कृषी, गृहोपयोगी वस्तूंच्या किमती वाढणार; यांत्रिक उपकरणांसाठी मोजावे लागणार जादा भाडे
Fuel Price Hike
इंधन दरवाढ
Published on
Updated on

सिंधुदुर्ग : पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून महागाईने पुन्हा डोके वर काढले आहे. इंधन दरवाढीची झळ घरापर्यंत पोहोचू लागली आहे. जीवनावश्यक वस्तूंपासून ते शेतीच्या मशागतीपर्यंत सर्वच गोष्टी महाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाहतूक खर्च वाढल्याने बाजारातील सर्व वस्तुंच्या किमती वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी करून तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

अलिकडच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेली ही सलग चौची वाढ आहे. जिल्ह्यात सध्या पेट्रोलचा दर ११३. ५० रु. प्रतिलिटर आहे. डिझेलच्या दरात २ रु. १७ पैशांची वाढ झाली असून ९७ रुपयांवर असलेले डिझेल आता ९९.८१ रु. प्रतिलिटर झाले आहे. डिझेलचे दरही आता पेट्रोलप्रमाणे शंभरी पार करण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने वाहनधारक, व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

वाहतूक खर्च वाढणार

इंधन दरवाढीचा सर्वाधिक परिणाम वाहतूक क्षेत्रावर होत आहे. मालवाहतूक खर्चात वाढ झाल्याने भाजीपाला, थान्य, दूध, किराणा माल, फळे, बांधकाम साहित्याच्या किमती वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातून शहरांकडे येणाऱ्या कृषी उत्पादनांच्या वाहतुकीचा खर्च वाढल्याने त्याचा बेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होईल. किरकोळ विक्रेत्यांनाही वाहतूक खर्च अधिक करावा लागत असल्याने महागाईचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.

घरगुती बजेट कोलमडणार

कोरोनानंतर आर्थिक संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वसामान्यांसाठी दरवाढ मोठा धक्का मानली जात आहे. अनेक कुटुंबांचे उत्पन्न अद्याप स्विर झालेले नसताना इंधनाच्या वाढत्या किंमतींनी घरगुती बजेट विस्कळीत केले आहे. नोकरदार वर्गासाठी रोजच्या प्रवासाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांनाही बसणार आहे. पूर्वी शेतीच्या मशागतीसाठी बैलांच्या औताचा वापर होत असे. मात्र, बदलत्या काळानुसार शेतीत यांत्रिकीकरण वाढले असून ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ग्रास कटर, डिझेलवर चालणाऱ्या इतर यंत्रसामग्रीचा वापर मोठा वाढला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींचा थेट परिणाम शेती खर्चावर होत आहे.

डिझेलचा अतिरिक्त खर्च

ग्रामीण भागात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पंप, फवारणी यंत्रे, जनरेटर आदी साधनांसाठी डिझेलचा वापर केला जातो. डिझेलच्या किंमती वाढल्याने शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर अतिरिक्त खर्च होत आहे. भविष्यात पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झाल्यास स्थिती आणखी गंभीर होऊ शकते, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. कृषी वापरांसाठी स्वतंत्र सवलतीच्या दरात इंधन उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

खाद्यतेलही वाढले

खाद्यतेलाच्या किंमतींतही झालेली वाढ गृहिणींसाठी डोकेदुखी ठरत आहे. काही दिवसांपूर्वी १५० रु.ना मिळणारे खाद्यतेल आता १७५ वर पोहोचले आहे. त्यामुळे स्वयंपाकघराचा खर्च वाढला आहे. घरगुती बजेट सांभाळताना गृहिणींना कसरत करावी लागत आहे. डाळी, तांदूळ, साखर, मसाले आदी किराणा मालाच्या किंमतीही वाढत असल्याने सामान्य कुटुंबांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. वाहतूक व्यावसायिकांनाही दरवाढीचा फटका बसत आहे. मालवाहतूक टक, खासगी बस, रिक्षा, टॅक्सी चालकांचे इंधन खर्च वाढले आहेत. त्यामुळे प्रवासी भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रवासी भाडे वाढले तर त्याचा परिणाम रोजच्या प्रवासावर अवलंबून असलेल्या नागरिकांवर होणार आहे.

इंधन दरवाढीमुळे छोट्या व्यावसायिकांनाही आर्थिक फटका बसत आहे. किराणा दुकानदार, दूय, भाजी विक्रेते, छोट्या उद्योगांनाही माल वाहतुकीसाठी अधिक खर्च करावा लागत आहे. परिणामी त्यांनाही वस्तूंच्या किंमती वाढवण्याशिवाय पर्याय उरणार नाही. अनेकांनी पर्यायी इंधन आणि सार्वजनिक वाहतुकीकडे वळण्यास सुरुवात केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असल्याचे वाहन विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, ग्रामीण भागात अद्याप सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, चार्जिंग सुविधा मर्यादित असल्याने सर्वसामान्यांना त्याची फारसा फायदा होत नाही.

बांधकाम क्षेत्रावरही परिणाम

बांधकाम क्षेत्रावरही या दरवाढीचा परिणाम जाणवू लागला आहे. सिमेंट, लोखंड, बाजू आणि इतर बांधकाम साहित्याच्या वाहतुकीचा खर्च वाढल्याने घरबांधणीचा खर्च वाढणार आहे. आधीच घरांच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्य नागरिकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न दूर जात असताना इंधन दरवाढीमुळे हा खर्च आणखी वाढणार आहे. बांधकाम व्यावसायिकांनीही वाहतूक खर्च वाढल्याने प्रकल्प खर्च वाढत असल्याचे सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news