

पणजी : पुढारी वृत्तसेवा
सध्याच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेला (एआय) महत्त्व प्राप्त झाले असून, त्याचे ज्ञान सर्वांसाठी आवश्यक ठरत आहे. भविष्यात एआय क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. गोव्यातील युवकांनी त्याचा लाभ घ्यावा. यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि शिक्षण खात्यातर्फे शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी एआय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
पणजी येथे गुरुवारी आयोजित गोवा एआय टेक कॉन्क्लेव्हमध्ये गोवा एआय धोरण २०२६ चे अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी माहिती व तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे, आयटी महामंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, आयटी खात्याचे सचिव संतोष सुखदेवे, संचालक कबीर शिरगावकर, व्यवस्थापकीय संचालक प्रवीण वळवईकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. प्रशांत आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, कौशल्य विकास, स्टार्टअप्स आणि क्षमता बांधणीसाठी एआयचा अधिकाधिक लोकांपर्यंत प्रसार होणे आवश्यक आहे. एआय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षा असून, त्यांची दूरदृष्टी आता कृतीत उतरत आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकतेसाठी एआयचा व्यापक वापर होईल, याची खात्री केली पाहिजे.
राज्याची एआय परिसंस्था मजबूत करणे आणि सर्वसमावेशक, भविष्यासाठी सज्ज डिजिटल अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देणे, हा कॉन्क्लेव्हचा उद्देश आहे. महाविद्यालयांचे एआय शिक्षण प्रयोगशाळांमध्ये रूपांतर करणे, कौशल्य विकास व क्षमता बांधणी मजबूत करणे आणि युवकांना नव्या संधींसाठी तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान व शिक्षण विभागांमध्ये समन्वय आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
सार्वजनिक सेवा वितरण सुधारण्यासाठी, समुदायांना सक्षम करण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी एआयमध्ये मोठी क्षमता आहे. या तंत्रज्ञानाचा लोकांना लाभ व्हावा, पर्यावरणाचे संरक्षण व्हावे आणि सर्वसमावेशक प्रगती साधली जावी, यावर सरकारचा भर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
एआयसज्ज गोव्याची उभारणी आणि युवकांचे सक्षमीकरण हे विकसित गोव्याच्या प्रगतीतील महत्त्वाचे टप्पे ठरतील, असेही त्यांनी नमूद केले. मंत्री रोहन खंवटे म्हणाले, तरुणांच्या हितासाठी एआय धोरण आणणाऱ्या मोजक्या राज्यांमध्ये गोव्याचा समावेश होत असल्याचा अभिमान आहे.
राज्याची तंत्रज्ञान परिसंस्था मजबूत करण्यासाठी, स्टार्टअप्सना पाठबळ देण्यासाठी आणि कौशल्य विकास व उद्योजकतेच्या संधी निर्माण करण्यासाठी पर्वरी येथे सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर गोवा टेक्नो पार्क उभारण्याची योजना आहे.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते गोवा एआय धोरण २०२६ चे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात हायपरलॉकच्या 'लिव्हिंग लायब्ररी ऑफ गोवा रुरल एआय' हा अहवाल सादर करण्यात आला. एआय प्रशिक्षणार्थींनी त्यांचे अनुभव कथन केले. तसेच 'ड्रोन दीदी' उपक्रमातील महिला ड्रोन प्रशिक्षणार्थींचा सत्कार करण्यात आला.
माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि संचार विभागाने एआय संशोधन, स्टार्टअप्स, कौशल्य विकास आणि एआयच्या व्यावहारिक उपयोगांना चालना देण्यासाठी बिट्स पिलानी, के. के. बिर्ला गोवा कॅम्पससोबत सामंजस्य करार केला. गोवा एआय टेक कॉन्क्लेव्ह २०२६ मध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.