

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मिरामार येथे मुख्य जलवाहिनी फुटल्याने पणजीसह आसपासच्या भागात निर्माण झालेले पाणीसंकट सलग दुसऱ्या दिवशीही कायम आहे. जलवाहिनी फुटून २४ तास उलटूनही दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. मिरामार, सांत इनेझ, ताळगाव आणि पणजीतील विविध निवासी व व्यावसायिक भागांना पाणीपुरवठा खंडित झाल्याचा मोठा फटका बसला आहे.
दुरुस्तीच्या संथ कामावरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवावा लागल्याने पणजीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
अनेक भागांत सकाळापासून नळांना पाणी न आल्याने घरगुती कामे, स्वयंपाक आणि दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले आहेत. सलग दुसऱ्या दिवशीही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने हजारो कुटुंबांची गैरसोय होत असून, पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे.
या पाणीटंचाईचा परिणाम निवासी भागापुरता मर्यादित राहिलेला नाही.
हॉटेल व्यावसायिक, रुग्णालये आणि खासगी कार्यालयांनाही त्याचा फटका बसला आहे. दरम्यान, खासगी टँकरच्या मागणीत वाढ झाल्याने काही टँकरचालकांकडून जादा दर आकारले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. पाणीटंचाईच्या काळात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
जुन्या आणि जीर्ण जलवाहिन्यांची वेळेवर दुरुस्ती किंवा बदली न केल्यामुळे अशा घटना घडत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. जलवाहिनी फुटल्यानंतर तातडीने दुरुस्ती करण्याबरोबरच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही होत आहे.