

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असताना, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करू नका. नदीत उपलब्ध व पिण्यायोग्य नसलेले तसेच वाहते पाणी घाट, रस्ते आणि अन्य बांधकामांसाठी वापरा, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरण्याऐवजी उपलब्ध पर्यायी जलस्रोतांचा वापर करून पाण्याची काटकसर करण्यावर भर देण्यास त्यांनी संबंधित यंत्रणांना सांगितले.
यंदा जिल्ह्यात अपेक्षेच्या तुलनेत पाऊस कमी झाला. पाऊस झाला तरी तो जमिनीत मुरण्याऐवजी लगेच वाहून गेला. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढलेली नाही. अनेक ठिकाणी विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खाली गेली आहे. आगामी काळात उन्हाची तीव्रता वाढून बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढण्याची शक्यता असल्याने आतापासूनच पाण्याचे नियोजन आणि काटकसर करणे आवश्यक आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता भासणार आहे. मात्र, त्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सिंहस्थ पावसाळ्यात असल्याने पर्वणींसाठी व अन्य पवित्र कामांसाठी आवश्यक ते पाणी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहनही महाजन यांनी केले.
रब्बी हंगामाबाबत सावधगिरी:
भूजलपातळी खालावल्याने दुष्काळी परिस्थिती असलेल्या भागांमध्ये रब्बी हंगाम घेण्याबाबतही महाजन यांनी सावधगिरीचा इशारा दिला. जनांवरांसाठी चारा उपलब्ध व्हावा, यासाठी चारा देणारी पिके घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार असून, त्यासाठी बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. दुष्काळाची तीव्रता वाढल्यास चाराटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात चारा कसा उपलब्ध करता येईल तसेच अन्य राज्यांतून चारा मिळू शकतो का, याचाही विचार सुरू असल्याचे महाजन यांनी सांगितले.
उद्यानांसाठी सांडपाण्याचा पुनर्वापर करा:
पाणी जपून वापरण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या असून, गरज भासल्यास एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासह पाणीकपातीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन करताना अनावश्यक वापरावर निर्बंध आणण्याची भूमिका महाजन यांनी मांडली. तसेच घरगुती वापरातील पाणीही जपून वापरण्याची गरज असून, उद्यानांसाठी सांडपाण्याचा पुनर्वापर करावा, वाहन धुण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर टाळावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.