

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते विकासकामांना वेग आला असून, गंगापूर रोडवरील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नाशिक महापालिकेने महत्त्वाकांक्षी प्रस्ताव तयार केला आहे. भोसला महाविद्यालय ते कबीरनगर झोपडपट्टी मार्गे बारदान फाटा या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी महापालिकेने नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण समितीकडे तब्बल ६६ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे.
सिंहस्थपूर्व रस्ते विकास प्रकल्पांमध्ये गंगापूर रोडचा स्वतंत्रपणे विचार झालेला नव्हता. बारदान फाटा ते अशोक स्तंभ या प्रमुख मार्गावरील भूसंपादनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्यामुळे पर्यायी वाहतूक मार्ग विकसित करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानुसार भोसला महाविद्यालय ते बारदान फाटा या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
सध्या या मार्गाची रुंदी सुमारे नऊ मीटर असून, प्रस्ताव मंजूर झाल्यास रस्ता एकूण १५ मीटरपर्यंत विस्तारित केला जाणार आहे. त्यामुळे अतिरिक्त सहा मीटर रुंदीचा मार्ग उपलब्ध होणार आहे. कबीरनगर झोपडपट्टी परिसरातील अडचणी लक्षात घेता, त्या भागात तात्पुरत्या स्वरूपात १२ मीटर रुंदीकरण करण्यात येणार असून, उर्वरित मार्ग १५ मीटर रुंदीचा विकसित केला जाणार आहे.
वाढत्या नागरीकरणामुळे समस्या गंभीर
आनंदवली, पाइपलाइन रोड आणि परिसरातील भागात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर निवासी वसाहती विकसित झाल्या आहेत. मात्र, त्या भागातील अंतर्गत रस्ते तुलनेने अरुंद असल्यामुळे वाहतूक वारंवार ठप्प होते. ही वाहतूक पुढे आनंदवलीमार्गे गंगापूर रोडला मिळत असल्यामुळे मुख्य मार्गावरील कोंडी आणखी वाढते. प्रस्तावित पर्यायी रस्ता विकसित झाल्यास या भागातील वाहनचालकांना नवीन पर्याय उपलब्ध होईल आणि गंगापूर रोडवरील वाहतुकीचा दबाव कमी होण्यास मदत होईल.
गंगापूर रोडवरील ताण कमी होण्याची अपेक्षा
प्राधिकरणाकडून प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास गंगापूर परिसरातून महात्मानगर, कॉलेज रोड आणि शहराच्या मध्यवर्ती भागाकडे जाणाऱ्या वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. सध्या गंगापूर रोड हा पश्चिम नाशिकमधील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग झालेला असून, येथे सकाळ - सार्यकाळ वारंवार वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
सिंहस्थपूर्व पायाभूत सुविधांना चालना
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध रस्ते प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. भोसला महाविद्यालय - बारदान फाटा मार्गाचे रुंदीकरण हा त्यातील महत्त्वाचा प्रकल्प मानला जात असून, प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.