

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असून, नाशिक-त्र्यंबकेश्वर या दोन महत्त्वाच्या सिंहस्थ क्षेत्रांना जोडणाऱ्या आयटीआय सिग्नल ते पिंपळगाव बहुला (महापालिका हद्दीपर्यंत) मार्गावरील युटिलिटी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. सुमारे ४.७७० किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाच्या मार्गावर पाणीपुरवठा, सांडपाणी, गॅस पाइपलाइन, ऑप्टिकल फायबर केबल (ओएफसी) आणि पावसाळी पाणी निचरा व्यवस्थेची कामे प्रगतिपथावर असून, भविष्यातील वाहतूक आणि नागरी सुविधांना बळकटी मिळणार आहे.
सिंहस्थ काळातील यात्रेकरूंची वाढती गर्दी, पार्किंग व्यवस्था आणि शहराच्या दीर्घकालीन विकासाचा विचार करून विविध विभागांच्या समन्वयातून ही कामे राबविण्यात येत आहेत.
महापालिकेच्या माहितीनुसार पाणीपुरवठा, सिव्हरेज आणि एमएनजीएल गॅस पाइपलाइनची कामे शंभर टक्के पूर्ण झाली आहेत. तर डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी ओएफसी नेटवर्क विस्तार आणि स्टॉर्म वॉटर ड्रेनेजची कामे वेगाने सुरू आहेत.
वाहतुकीत तात्पुरते बदल
कामांच्या पार्श्वभूमीवर आयटीआय सिग्नल ते महिंद्रा सर्कलदरम्यान रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत दोन्ही दिशेची वाहतूक रस्त्याच्या दुसऱ्या खुल्या बाजूने सुरू राहणार असून, पर्यायी मार्गांचाही वापर करण्यात येणार आहे. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
सिंहस्थपूर्व कामांमध्ये केवळ तात्पुरत्या गरजा नव्हे तर शहराच्या दीर्घकालीन विकासाचाही विचार केला जात आहे. या मार्गावरील युटिलिटी कामे पूर्ण झाल्यानंतर वाहतूक अधिक सुरळीत होईल, नागरी सुविधा सक्षम होतील आणि भविष्यातील विकासकामांना मजबूत आधार मिळेल. दर्जा, टिकाऊपणा आणि नागरिककेंद्रित नियोजन यांना प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
मनीषा खत्री, आयुक्त, महापलिका, नाशिक