

नाशिक : गणेशोत्सवानिमित्त बाजारात असंख्य प्रकारच्या मिठाया तसेच खव्याचे पदार्थ दाखल झाले आहेत. त्यातील भेसळखोरीला लगाम घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन अलर्ट झाले आहे. प्रशासनाने खास पथके तयार केली असून, या पथकांच्या माध्यमातून दररोज विविध भागांत धाडी टाकल्या जात आहेत. पथकात आठ निरीक्षकांचा अंतर्भाव असून, नमुने तपासणीचे काम सध्या जोरात सुरू आहे.
मागील काही दिवसांपासून नाशिकमध्ये भेसळयुक्त अन्नपदार्थांची सर्रास विक्री केली जात असल्याचे उघड झाले आहे. विशेषत: सण-उत्सव काळात हे प्रकार सर्वाधिक समोर येतात. सध्या गणेशोत्सवानिमित्त मिठाई, गोड, खव्याचे, दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री वाढली आहे. या पदार्थांमधील भेसळ शोधण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून नियमित तपासणी केली जात आहे. शहरातील सहाही विभागांत पथकांकडून मिठाई दुकाने तसेच कारखान्यांवर धाडसत्र सुरू आहे. पथकाकडून अन्न पदार्थांचे नमुने घेतले जात आहेत. गणेशोत्सवानंतर नवरात्र, दसरा, दिवाळी असे लागोपाठ उत्सव असल्याने, डिसेंबरपर्यंत नियमितपणे अशा प्रकारची कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
- मिठाईमध्ये कृत्रिम खाद्यरंगांचा वापर होत असून, रंग हातास लागल्यास त्यात भेसळीची शक्यता
- वर्ख (चांदीचे आवरण) किंवा ॲल्युमिनियम फॉइल वापरलेल्या मिठाईचे सेवन टाळाp >- सुट्या स्वरूपातील खवा खरेदी करणे टाळावे
- पॅकबंद खव्याच्या लेबलवरील उत्पादन, दिनांक, बेस्ट बिफोर, घटक पदार्थ, उत्पादकाचे नाव व पत्ता, एफएसएसएआय परवाना / नोंदणी क्रमांक आदींची तपासणी खरेदीपूर्वी करावी
- नोंदणीधारक, परवानाधारक उत्पादक, वितरक यांच्याकडूनच खवा खरेदी करावा
- दाणेदार खव्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता अधिक असल्याने खरेदी करणे टाळावे
अन्न व औषध प्रशासनाकडून जिल्ह्यातील मिठाई, खवा, मावा, खाद्य तेल, वनस्पती तूप आणि सणासुदीसाठीच्या अन्नपदार्थांची, विक्रेत्यांच्या मालाची कसून तपसाणी केली जात आहे. यामध्ये उत्पादक, रीपॅकर आणि घाऊक विक्रेते यांची विशेष तपासणी मोहीम राबविली जात असून, घरगुती प्रसाद आणि नैवेद्य तयार करणाऱ्यांवरही प्रशासनाची करडी नजर आहे.
पथकांच्या माध्यमातून मिठाई तसेच दुग्धजन्य पदार्थांची नियमित तपासणी केली जात आहे. तसेच नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत. ग्राहकांनीदेखील सजगपणे मिठाई खरेदी करावी. भेसळयुक्त पदार्थ विक्री होत असल्यास त्याबाबतची माहिती अन्न प्रशासनास द्यावी.
विवेक पाटील, सहायक आयुक्त, अन्न प्रशासन