नाशिक : आनंदपर्व गणेशोत्सवास शनिवारी (दि. ७) उत्साहात प्रारंभ झाला. चाैदा विद्या, चाैसष्ट कलांचा अधिपती श्री गणेशाचे स्वागत नाशिककरांनी वाजतगाजत जल्लोषात केले. घरोघरी व सार्वजनिक मंडळांमध्ये विधिवत पूजनाने गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली. भाविक पुढचे दहा दिवस लाडक्या बाप्पाच्या भक्तीत रममाण होतील.
अवघ्या भक्तांना आतुरता लागून असलेल्या गणेशोत्सवास जल्लोषात प्रारंभ झाला. जिल्हाभरात उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. ढोल-ताशांच्या गजरात व गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या घोषात भक्तांनी गणरायाचे स्वागत केले. नाशिक शहरातील बाजारपेठेत पहाटेपासूनच पूजेचे साहित्य घेण्यासाठी गणेशभक्तांची लगबग सुरू होती. भाविकांनी मध्यान्हापर्यंत घरोघरी गणरायांची प्राणप्रतिष्ठा केली. तसेच शहरातील मानाच्या गणेशांसोबत विविध मंडळांच्या गणेशाचे आगमन मिरवणुकांनी झाले. यावेळी ढोल पथकांनी सादर केलेल्या वादनाने अवघा आसमंत दणाणून गेला होता. ग्रामीण भागातही वाजतगाजत श्री गणेशाचे स्वागत करण्यात आले. यावेळी भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
विघ्नहर्त्याच्या आगमनाने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. बाजारपेठेत गेल्या काही काळापासून असलेली मरगळ यानिमित्ताने दूर झाल्याने व्यापारी व व्यावसायिकांमध्ये समाधान पसरले आहे. गणेशोत्सवानिमित्त पुढील दहा दिवस नाशिक शहर व जिल्हा भक्तिमय वातावरण दंग असणार आहे. वरुणराजाने कृपा केल्याने गणेशभक्तांचा आनंदा द्विगुणित झाला.
श्रीगणेशाला मोदक प्रिय आहेत. यंदाच्या वर्षी बाजारपेठेत चॉकलेट, ड्रायफ्रूट, मावा आदी प्रकारचे मोदक विक्रीसाठी दाखल झाले आहेत. तसेच विविध प्रकारच्या मिठाईदेखील उपलब्ध आहेत. लाडक्या बाप्पासाठी मोदक घेण्याकरिता भक्तांनी मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.