

नाशिक : सध्या कोसळत असलेल्या जोरधार पावसामुळे जिल्ह्यातील दहाहून अधिक धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्या गंगापूर धरणात 97 टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. उद्या पावसाचा यलो अलर्ट असल्याने लाडक्या गणरायाचे आगमनही पावसात होणार आहे.
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने धरणातून 3025 क्यूसेकने विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदीलगतच्या परिसरासह रामकुंड परिसरातील व्यावसायिक व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील धरणसाठ्यात 90.74 टक्के पाणीसाठा आहे.
शहरात सोमवारी (दि. 25) 2.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने उद्या बुधवारी (दि.27) यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे गणपतीचे आगमनही पावसात होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यांंत विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चार जिल्ह्यांंना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील घाटमाथा व अहिल्यानगर जिल्ह्यांंत ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दारणा 6104
गंगापूर 3025
कश्यपी 640
वालदेवी 407
आळंदी 87
भावली 588
भाम 2093
वाघाड 767
तीसगाव 68
करंजगाव 1130
नांदूरमध्यमेश्वर 12620
वाकी 995
कडवा 1176
पालखेड 1592
पुणेगाव 450
ओझरखेड 443
मुकणे 726
गौतमी गोदावरी 575
नाशिक जिल्ह्यात यंदा दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मे महिन्याच्या मध्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. जून महिन्यात वेळेत मान्सून दाखल झाल्याने नाशिक जिल्हावासियांचे पाणीटंचाईचे संकट दूर झाले. 1 जून ते 24 ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात 553 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.