

सिन्नर : मानवासह नायलॉन मांजा पशुपक्ष्यांसाठी किती घातक आहे, याचे विदारक चित्र पुन्हा एकदा सिन्नरमध्ये पाहायला मिळाले. सिन्नर येथील महावितरण कार्यालयाजवळ एका मोठ्या परदेशी पक्ष्याला नायलॉन मांजामुळे गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली.
घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते विष्णू गोजरे यांनी दिल्यानंतर तत्काळ पक्षिमित्र राहुल कालेवार व संदीप साठे घटनास्थळी दाखल झाले. मात्र, जखमी पक्षी परिसरात लपल्याने त्याला पकडणे कठीण ठरत होते. सुनील लांडगे यांच्या मदतीने जखमी पक्ष्यावर ताबा मिळवला.
नायलॉन मांजामुळे पक्ष्याच्या पंखांना व शरीराला गंभीर इजा व रक्तस्त्राव होत होता. मोठी चोच व आकाराने भला मोठा असल्याने सुरुवातीला या पक्ष्याची ओळख पटणे कठीण गेले. उपचारासाठी राहुल कालेवार, शंतनू कोरडे, संदीप साठे यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाने प्रसंगावधान राखत जखमी पक्षी ताब्यात घेऊन प्राथमिक उपचारासाठी हलवले. प्रयत्नांबद्दल पक्षीप्रेमींचे कौतुक होत आहे.
पक्षी करकोचा असल्याचा अंदाज दरम्यान
हा पक्षी उप-सहारा आफ्रिकेतील माराबू करकोचा असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पंख पसरवणारा, जमिनीवरचा आकाराने सर्वात मोठा परदेशी पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या करकोचाला पाठीमागील रचनेमुळे अंडरटेकर पक्षी असेही म्हटले जाते.