

नाशिकः पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळा हा जागतिक दर्जाचा सोहळा असून देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत. पर्वणी काळातील अमृतस्नानासाठी नवीन घाटांची निर्मिती करताना त्यांच्या सौंदर्याकरणावर भर द्यावा, तसेच सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत, अशा सूचना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात विविध शासकीय विभागांचा आढावा महाजन यांनी घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या आयुक्त करिश्मा नायर, नाशिक पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, त्र्यंबक नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रेया देवचके यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
महाजन म्हणाले की, नवीन घाट शंभर वर्षांचा दृष्टीकोन ठेवून दगडात बांधले पाहिजेत. घाटांचे सुशोभीकरणासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. नैसर्गिक साधनसंपत्तीला बाधा होणार नाही, याची काळजी घ्यावी. आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक मनुष्यबळ, वाहने व इतर बाबींचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. आवश्यक निधीसाठी संबंधित विभागांनी मान्यता घेऊन तातडीने कामांना गती द्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
तपोवनजवळ लक्ष्मी नारायण मंदिर परिसरात नवीन घाट निर्मितीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. भाविकांच्या सोयीसाठी हे घाट उपयुक्त ठरतील. तसेच नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे काम प्रथम प्राधान्याने पूर्ण करून दुभाजकांचे सौंदर्याकरण करावे, अशा सूचना डॉ. गेडाम यांनी दिल्या.