

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भोंदू अशोक खरात प्रकरणातील तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या प्रकरणाचे धागेदोरे उच्चस्तरीय शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंधित कनेक्शनबाबत संशय व्यक्त केला जात असून, या संदर्भातील माहिती तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे.
यामधूनच या महिला आयएएस अधिका-यासाठी नाशिक जिल्हाधिकारी पद मिळवून देण्यासाठी त्याने लॉबिंग केल्याची चर्चा रंगू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा शासकीय अधिकाऱ्यांच्या 'चॉइस पोस्टिंग'मध्ये हस्तक्षेप करत असल्याची बाब यापूर्वीच समोर आली होती.
एका महिला आयएएस अधिकारी त्यांची वारंवार भेट घेत असल्याचे समोर येत आहे. या अधिकाऱ्यांना नाशिक जिल्हाधिकारी पद मिळवून देण्यासाठी त्याने शासनपातळीवर मंत्र्यांकडे लॉबिंग केल्याची चर्चादेखील आहे. या संदर्भात काही पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
संबंधित महिला अधिकारी या खरातच्या शिवनिका संस्थानांतर्गत येणाऱ्या ईशान्येश्वर मंदिरात वारंवार भेट देत, त्यांची पूजा करत असल्याची जोरदार चर्चा आहे. या भेटींचा नेमका उद्देश काय, तसेच त्यामागील संबंध किती खोलवर आहेत, याचा तपास सुरू असल्याचे समजते.
सिन्नर तालुक्यातील दुर्गम भागातील जमिनींच्या व्यवहारांमध्येही संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या संबंधातून तालुक्यात जमीन खरेदी केल्याचे सांगितले जात आहे.
या व्यवहारांत खरात आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असल्याचे बोलले जात आहे. या व्यवहारांची कागदपत्रे तपासली जात असून, त्यातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
या प्रकरणामुळे प्रशासनातील पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही बारीक लक्ष ठेवले जात आहे. भोंदूगिरीच्या आड उभ्या राहिलेल्या या कथित जाळ्याचा विस्तार किती मोठा आहे, याचा अंदाज येऊ लागला असून, तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.