

नाशिक : शेती पिके काढण्यासाठी काढलेले कर्ज आणि त्यातच बेमोसमी पावसाने केलेला घात त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनयात्रा संपविण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नाशिक विभागात तब्बल नऊ महिन्यांत २८६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव, अ.नगर या पाच जिल्ह्यांमध्ये गेल्या जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान या जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक माहिती शासकीय अहवालातून समोर आली आहे. हवामानातील अनिश्चितता, पीकविम्याचा अपुरा लाभ, बाजारात दर घसरणे आणि कर्जाचा डोंगर त्यात आता परतीच्या पावसाची भर या कारणांनी हतबल झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे.
जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक १५१ आत्महत्या झाल्या असून, अहिल्यानगरमध्ये ६८, धुळे ६१, नाशिक ५, तर नंदुरबारमध्ये एका शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविल्याचे अधिकृत आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. मे आणि जून महिन्यांत अवकाळी पावसाने सुरुवात केल्यामुळे जुलै महिन्यात सर्वाधिक 44 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविल्या आहेत. निसर्गाच्या आघातामुळे शेतकरी कर्जाच्या चक्रात अडकला आहे.
शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या विविध कर्जमाफी, पीकविमा योजना, शाश्वत सिंचन प्रकल्प अशा योजना प्रत्यक्षात पोहोचतात का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक शेतकरी पीकविम्याच्या लाभासाठी महिनोनमहिने हेलपाटे मारत आहेत, पण त्यांना वेळेत आणि पुरेसा लाभ मिळत नाही. या निराशेतून शेतकरी जीवनयात्रा संपवण्याचे पाऊल उचलत आहेत. सरकारने त्वरित ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची गरज असल्याची मागणी संघटनांकडून होत आहे.
हे हवेत उपाय
निसर्ग कोपताच त्वरित मदत द्यावी.
हमीभावाची कडक अंमलबजावणी करावी.
कृषी कर्जमाफी आणि पुनर्रचना करावी.
सिंचन सुविधा वाढवाव्यात.
शेतकरी मानसिक आरोग्य केंद्रे सुरू करावीत.
पीकविमा योजनांचा पारदर्शक वापर करावा.
शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी व शेतकऱ्याला नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही म्हणून शासनाने शेतकऱ्यांच्या गरजा शोधून पुढील योजना आखाव्यात.
राजू देसले, किसानसभा राज्य उपाध्यक्ष
गेल्या ९ महिन्यांतील आकडेवारी अशी...
एकूण आत्महत्या 286
निश्चित केलेल्या 135
मदतीस पात्र 89
तपासणीसाठी 68
मदत झालेले शेतकरी 114
पंजाब ५० हजार रुपये हेक्टर याप्रमाणे मदत देत आहे. महाराष्ट्रात ८ हजार रुपये हेक्टर मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळत आहे. सरकारने त्वरित शेतकऱ्यांचे पंचनामे करून मदत जाहीर करावी अन्यथा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही.
नाना बच्छाव, शेतकरी संघर्ष संघटना, प्रदेश कार्याध्यक्ष