

ठळक मुद्दे
सर्वाधिक १७२ शेतकरी जीवनयात्रा संपविल्याच्या घटना केवळ बीड जिल्ह्यात
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही १२८ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली
जीवनयात्रा संपविणाऱ्या शेतकरी कुटुंबांना शासनाकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत
छत्रपती संभाजीनगर : कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे मराठवाड्यात शेतकरी जीवनयात्रा संपविण्याचे सत्र कायम आहे. गेल्या आठ महिन्यांत मराठवाड्यात तब्बल ७०७ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक १७२ शेतकरी जीवनयात्रा संपविल्याच्या घटना केवळ बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. विभागात दिवसाला सरासरी तीन शेतकरी नाइलाजाने आपली जीवनयात्रा संपवत आहेत.
मराठवाड्यात सर्वदूर सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. बहुतेक शेती ही कोरडवाहू स्वरूपाची आहे. मागील काही वर्षांत कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा खंड यामुळे शेती पिकांचे नुकसान होऊन त्याचा उत्पन्नावर परिणाम होत आहे. शिवाय पिकविलेल्या शेतीमालाला हमीभावाप्रमाणे दर मिळत नसल्यानेही शेतकरी अडचणीत आला आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. या सर्व गोष्टींना कंटाळून अनेक शेतकरी टोकाचा निर्णय घेऊन आपले जीवन संपवत आहेत. गेल्या आठ महिन्यांत मराठवाड्यातील ७०७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यात जानेवारी महिन्यात विभागात ८८ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात ७५, मार्च महिन्यात ११०, एप्रिल ८८, मे महिन्यात ७८, जून महिन्यात ८५, जुलै महिन्यात १०९ आणि ऑगस्ट महिन्यात ७६ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविल्या आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १७२ दुर्देवी घटना घडल्या असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही १२८ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. अन्य जिल्ह्यांतही शेतकरी आत्महत्यासत्र कायम आहे.
१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या बारा महिन्यांत मराठवाड्यातील तब्बल ९४८ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालात नमूद आहे. यात बीड जिल्ह्यात जिल्ह्यात सर्वाधिक २०५ वनयात्रा संपविल्याची नोंद झाली आहे.
जीवनयात्रा संपविणाऱ्या शेतकरी कुटुंबांना शासनाकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत ४६३ प्रकरणेच शासनाच्या आर्थिक मदतीसाठी पात्र ठरले आहेत. शासनाकडून आर्थिक मदत मिळाली. १५१ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत, तर ९३ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले.