

नाशिक : भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतीला व्यावसायिक रूप देणे गरजेचे आहे. युवा शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले पाहिजेत, असे प्रतिपादन कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.
कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात जयहिंद लोकचळवळ यांच्या वतीने 'युवा शेतकरी सन्मान सोहळा' पार पडला. यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे ते बोलत होते. व्यासपीठावर कृषी राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार डॉ. शोभा बच्छाव, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार मनोज कायंदे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. शैलेश चव्हाण, विलासराव शिंदे, राजाराम चव्हाण, नारायण वाजे, उत्कर्षा रूपवते, कैलास भोसले आदी उपस्थित होते.
मंत्री कोकाटे म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद लोकचळवळ ही निरोगी समाज निर्मितीचे काम करत आहे. जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून तरुण शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांतून तरुण शेतकऱ्यांना दिले जाणारे पुरस्कारही युवकांसाठी प्रेरणादायी आहेत, असे ते म्हणाले.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, डॉ. सुधीर तांबे तज्ज्ञ सर्जन आहेत. जनतेच्या आग्रहास्तव ते नगराध्यक्ष झाले. संगमनेर नगरपालिकेला दिशा दिली. त्यांनी पाच जिल्ह्यांमध्ये मोठा संपर्क निर्माण केला. जयहिंद युवा मंच युवकांची मोठी संघटना उभी केली. आज सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर या संघटनेचे काम सुरू आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अभयसिंह जोंधळे यांनी आभार मानले.
महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव हे न उलगडणारे कोडे आहे. ते सभागृहात नाहीत याची संपूर्ण राज्याला खंत आहे, असे कृषी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले. लोकनेते हे फक्त निवडणुकीपुरते नसून, माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे सातत्याने लोकांसाठी काम करत आहेत. कृषी क्षेत्रातील त्यांचे काम मोठे होते. स्वर्गीय वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांनी जलसंधारण खात्यामध्ये महत्त्वपूर्ण काम केले. शेतीपूरक उद्योगांना चालना दिली. या क्षेत्रामध्ये तरुणांना आणण्यासाठी जयहिंद लोकचळवळीचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी सांगितले.