नाशिक : शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, थकीत व्याज शासनाने भरावे, मुद्दलाचे हप्ते करून द्यावे, अशी शेतकऱ्यांची आग्रही मागणी बाजूला सारत राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी नवीन सामोपचार परतफेड (ओटीएस) योजनेचा ठराव मंजूर केला.
कर्जमाफी झाल्यास शेतकऱ्यांना भरलेली रक्कम परत मिळेल, असेही स्पष्ट करण्यात आले. तर, मंजूर योजनेचा प्रस्ताव सहकार आयुक्तांकडे पाठविला जाईल, त्यास मंजुरी मिळाल्यानंतर योजना लागू केली जाईल, असे प्रशासक संतोष बिडवई यांनी सांगितले.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. ४) प्रशासक बिडवई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला कृषीमंत्री ॲड. कोकाटे व जिल्हा बँकेचे संस्थात्मक सल्लागार विद्याधर अनास्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर विभागीय सहनिबंधक संभाजी कदम, जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिंदे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक ए. के. पाटील उपस्थित होते.
सभेच्या सुरूवातीस तालुका प्रतिनिधी निवडीवरून उद्धव निमसे व संजय तुंगार यांनी आक्षेप घेतल्याने गोंधळ झाला. सभासदांनी ही निवड प्रक्रिया उधळून लावली. सभासदांचा रोष विचारात घेऊन, अनास्कर यांनी बँकेची सद्यस्थिती अवगत करुन देत, नवीन योजना मांडली. प्रशासक बिडवई यांनी नवीन ‘ओटीएस’ योजनेचा ठराव मांडत, योजना नेमकी काय आहे, तिचे काय फायदे आहे हे सभागृहाला समजावून सांगितले. त्यावर, सभासदांनी विविध सूचना मांडल्या.
दिंडोरीचे प्रकाश शिंदे यांनी, कर्जमाफी शक्य नसेल तर किमान व्याज माफ करावे, अशी मागणी केली. तर, शेतकरी, थकबाकीदार व ठेवीदारांनी व्यासपीठासमोर गर्दी करत कर्जमाफी, व्याजमाफीचा आग्रह धरला, ज्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. त्यात मंत्री कोकाटे यांनी हस्तक्षेप करत शासनाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक शेतकऱ्यांनीच कर्जमाफीवरुन कोकाटे यांना प्रतिप्रश्न केले. त्यातून काहीकाळ वाद चालला. अखेर अनास्करांनी माईकचा ताबा घेत, कर्जमाफी, मदत व नवीन योजनेबाबतची भूमिका मांडली. त्यावरही शेतकऱ्यांचा गोंधळ सुरू राहिला, यातच मंत्री ॲड.कोकाटे यांनी नवीन कर्ज सामोपचार योजनेच्या ठरावास सभागृहाची मंजुरी घेतली अन् सभा आटोपती घेतली.
सभेतील चर्चेत संपत कदम, धर्मा शेवाळे, उध्दव निमसे, संजय तुंगार, जगदीश गोडसे, ॲड. नितीन ठाकरे, खंडू बोडके, प्रकाश शिंदे, डाॅ. सुनील ढिकले, राजू देसले, तानाजी गायधनी, विलास बोरसे, भालचंद्र पाटील आदींनी सहभाग घेतला.