

नाशिक : वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जाणारे महायुती सरकारमधील राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा कर्जमाफीवरून वादाला तोंड फोडणारे वक्तव्य केले आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या विशेष सभेत शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे काय झाले असा मुद्दा उपस्थित करत, कर्जमाफीचे गाजर दाखवून सत्तेवर आलात आता शब्द पूर्ण करा, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी मंत्री कोकाटे यांनी बोललो होतो, पण नाही होत तर मी काय करू असे उत्तर देत, शेतकऱ्यांपुढे हतबलता व्यक्त केली.
जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा मंत्री कोकाटे यांच्या उपस्थितीत झाली. सभेत नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजनेस मंजुरी देण्यात आल्याची माहिती मंत्री कोकाटे यांनी दिली. दरम्यान, सभेत, आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी, व्याजमाफीचा मुद्दा उपस्थितीत करत कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला. यावेळी वाढता गोंधळ लक्षात घेत, मंत्री कोकाटे यांनी माईकचा ताबा घेत जिल्हा बॅंकेबाबत भूमिका मांडली. एका बॅंकेला व्याजमाफी देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. शासनाकडून मदतीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने आमचा कांदा सडला आहे. पेरणी झालेली नाही अशा भावना व्यक्त करत, कर्जमाफीचे काय झाले अशी विचारणा केली तसेच 'कोकाटे साहेब निवडणुकीत कर्जमाफीची घोषणा केली होती. त्याचे काय झाले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील कर्जमाफी देण्याचे जाहीर केली होते. पण, निवडणुका झाल्यानंतर शेतकरी आशेवरच जगतो आहे,' असे म्हणत कर्जमाफीची विचारणा केली. यावर मंत्री कोकाटे यांनी आता होत नाही तर मी काय करू असे उत्तर दिले. त्यानंतर, पुन्हा शेतकऱ्यांनी प्रतिप्रश्न करत प्रश्नांचा भडिमार केला.
सभेत शेतकऱ्यांनी मंत्री कोकाटेंना त्यांच्या 'ओसाड गावाची पाटीलकी' या जुन्या विधानाची आठवण करून दिली. यावरून काही काळ शेतकरी व मंत्र्यांमध्ये बाचाबाचीही झाल्याचे दिसून आले. यानंतर सामोपचार कर्जवसुली योजना जिल्हा बँकेने सर्वानुमते मंजूर केली. मंत्री कोकाटे यांनी मंजुरीची घोषणा केली.
शेतकरी सभासदांनी व्याजमाफी देण्याची मागणी केली. याबाबत मंत्री कोकाटे यांनी एका बँकेकरिता निर्णय घेता येत नाही, तशी तरतूद करता येत नाही. कोणताही धोरणात्मक निर्णय घेताना सरकारला विचार करावा लागतो. एका बॅंकेसाठी हा निर्णय घेता येणार नाही. सर्व बॅंकांसाठी घ्यावा लागेल. मात्र, शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन याबाबत सरकारकडे पाठपुरावा करेल, असे अश्वासन मंत्री अॅड. कोकाटे यांनी यावेळी दिली.
हल्ली भिकारीसुध्दा एक रुपया घेत नाही. पण, आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना पीकविमा दिला आहे. कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? असा सवाल मंत्री कोकाटे यांनी उपस्थित करत, ढेकळांचे पंचनामे करायचे का? असे वादग्रस्त विधान केले होते. कर्ज घेता आणि पाच-दहा वर्षे कर्जमाफीची वाट पाहता, कर्जमाफी झाल्यावर त्याच पैशातून लग्न, समारंभाचा खर्च करता, असे वक्तव्यही त्यांनी यापूर्वी केले होते.
गेल्या दोन तीन महिन्यांपासून बँकेची वसुली व्हावी याकरिता प्रयत्न सुरू होते. दोन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य बँक प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत व्याजदर कमी करावा याबाबत प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार जिल्हा बॅंकेने नवीन सामोपचार योजना आणली. या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यावेळी काही सदस्यांनी विषय सोडून दुसरेच विषय उपस्थित केले. मात्र, त्यांना त्या सूचनाबाबत सरकारकडे पाठपुरावा करण्याबाबत अाश्वासित केले असल्याचे कोकाटे यांनी सांगितले आहे.