

जळगाव: पुढारी वृत्तसेवा
Farmer drowns in Girna River Jalgaon: कामधंद्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका कष्टकरी शेतकऱ्याला नियतीने वाटेतच गाठले. गिरणा नदीच्या पात्रातून बैलगाडी जात असताना, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि खड्ड्यात गाडी उलटल्याने वडनगरी येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली.
वडनगरी येथील रहिवासी असलेले दिलीप रामभाऊ कल्याणकर (वय ५५) आणि त्यांचे सहकारी चिंतामण नाईक हे दोघे दररोजप्रमाणे सरपंच दत्तू रामचंद्र पाटील यांच्या खेडी भोकर शिवारातील शेतात मजुरीसाठी जात होते. सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास त्यांची बैलगाडी गिरणा नदीच्या पात्रातून जात होती. मात्र, नदीपात्रात असलेल्या एका खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने अचानक बैलगाडी उलटली. या संकटकाळात चिंतामण नाईक यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत गाडीतून बाहेर उडी घेतली, ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले. दुर्दैवाने, दिलीप कल्याणकर यांना सावरण्याची संधी मिळाली नाही आणि ते खोल पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य राबवून शोध मोहीम सुरू करण्यात आली. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नांनंतर दिलीप कल्याणकर यांचा मृतदेह शोधण्यात यश आले. नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढताच त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला, ज्यामुळे उपस्थितांचेही डोळे पाणावले. या दुदैवी घटनेत एक बैल बचावला तर दुसरा बैल देखील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
मयत दिलीप कल्याणकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नेण्यात आला असता, नातेवाईक आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. एका कष्टाळू शेतकऱ्याच्या अशा अचानक जाण्याने वडनगरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.