

Father Girl and niece drowned in Wardha River
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील धानोरा गावाजवळ वर्धा नदीत घडलेल्या हृदयद्रावक घटनेत वडिलांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोन अल्पवयीन मुलींनीही आपला जीव गमावला. या दुर्दैवी प्रकारामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये राजू कोडापे (वय 40), त्यांची मुलगी अर्पिता कोडापे (वय 12) आणि भाची प्रियांका मडावी (वय 14) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर तालुक्यातील धानोरा गावालगतच्या वर्धा नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने राजू कोडापे हे खोल पाण्यात जाऊन बुडू लागले. वडील बुडत असल्याचे पाहून मुलगी अर्पिता त्यांना वाचवण्यासाठी नदीत धावली. मात्र, तिलाही पाण्याचा अंदाज न आल्याने तीही बुडू लागली.
यानंतर भाची प्रियांका मडावी हिने वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली. परंतु दुर्दैवाने तिलाही बाहेर पडता आले नाही आणि तिघेही पाण्यात बुडाले. हा सारा प्रकार अत्यंत वेदनादायक असून मदतीसाठी कोणीही वेळेत पोहोचू न शकल्याने तिघांचाही मृत्यू झाला.
राजू कोडापे हे राजुरा तालुक्यातील खामोणा गावचे रहिवासी असून ते आपल्या मुलगी अर्पितासह धानोरा येथे नातेवाईकांकडे आले होते. प्रियांका मडावी ही त्यांची भाची असून ती स्थानिक असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली असून मृतदेहांचा शोध घेतला जात आहे. या घटनेची नोंद घुग्घुस पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे धानोरा गावात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत.