

नाशिक/पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकाला लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असून, नागरिकांची कामे मंत्रालयाऐवजी गावपातळीवरच होण्यासाठी शासन प्राधान्याने प्रयत्न करीत असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
नाशिक तहसील व अपर तहसील कार्यालयातर्फे आडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उद्घाटनप्रसंगी मंत्री बावनकुळे बोलत होते.
यावेळी आ. अॅड. राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, मुद्रांक जिल्हाधिकारी संदीप आहेर, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक महेश इंगळे, तहसीलदार पंकज पवार, अपर तहसीलदार अमोल निकम, धान्य वितरण अधिकारी शामली धपाडे, नगरसेविका इंदुबाई खेताडे, रिद्धेश निमसे, अॅड. नामदेव शिंदे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
महसूलमंत्री म्हणाले की, दि. १ जानेवारी २०११ पूर्वी सरकारी जागेवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रॉपर्टी कार्डमुळे मालकी हक्क स्पष्ट होऊन बँक कर्ज, शासकीय योजना तसेच विविध शासकीय प्रक्रियांसाठी आवश्यक कागदपत्रे सुलभपणे उपलब्ध होतील.
तसेच दीर्घ काळापासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या मालमत्तांना कायदेशीर मान्यता मिळण्यास मदत होणार आहे. तसेच, महसूल विभागामार्फत वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन ही संकल्पना राबविण्यात येत असून, नागरिकांना जिल्ह्यात कुठेही आपल्या मालमत्ता नोंदणीची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
नागरिकांचे प्रश्न त्वरित सोडविण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन महत्त्वाचे असून, नागरिकांना मंत्रालयात जाण्याची गरज भासू नये, ही शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिका क्षेत्रामध्ये अशी शिबिरे राबविण्यात येणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या पहिल्या टप्प्यातून महाराष्ट्रात जवळपास २ लाख ९० हजार लाभार्थ्यांना विविध लाभ प्रदान केले गेले आहेत, तर नाशिक जिल्ह्यात १२ हजार २५९ नागरिकांना याचा लाभ झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
महसूल विभागातील पदांच्या सुधारित आकृतिबंधाला मंजुरी घेण्यात आली असून, जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान केल्यामुळे नागरिकांना १५ दिवसांत शेतमोजणी करून मिळणार आहे.
- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे