

घोटी : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरास गेल्या काही दिवसापासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भेडसावत आहे. शहराचा पाणीप्रश्न दिवसेंदिवस विस्कळीत होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तीन धरणांचे पाणी शहराला विळखा घालून प्रवाहीत होत असूनही घोटीकरांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे पाण्यासाठी याचना करावी लागत आहे.
काही नागरिकांनी आमदार हिरामण खोसकर यांच्यामार्फत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे व्यथा मांडल्यावर सीईओ यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत निर्देश दिले आहेत. गेल्या काही वर्षांपासून घोटीकर पाणी प्रश्नाने ग्रासले आहेत. ही स्थिती शहर विकासाला तसेच बाजारपेठ व्यापाराला बाधक असल्याने चित्र आहे.
विस्कळीत पाणीपुरवठा तसेच खंडित नियोजनाने ग्रामस्थांना पाणी विकत घेऊन तहान भागवी लागत आहे. गेल्या वर्षभरात ग्रामस्थांनी अनेक आंदोलनांद्वारे पाणीपुरवठा योजनेच्या प्रलंबित कामाकडे लक्ष वेधूनही ठेकेदार व यंत्रणेकडून तात्पुरता प्रतिसाद दिला जातो.
नंतर परिस्थिती पुन्हा 'जैसे थे' असे चित्र आहे. जिल्ह्यातील अनेक शहर, गावांचा पाणी प्रश्न सुटत असताना, ३ धरणांतील पाणी शहराला विळखा घालून पुढे जात असताना घोटीकरांना मात्र पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
त्यामुळे आता दाद मागायची तरी कोणाकडे असा प्रश्न ग्रामस्थांना भेडसावत आहे. अंबिकामाता यात्रोत्सवानिमित्त आमदार हिरामण खोसकर आले असताना, मर्चेंट बँकेचे संचालक भाऊ भोर, दीपक साखला, शरद हांडे यांनी खोसकर यांच्याकडे पाण्याबाबत व्यथा मांडली होती.
आमदार खोसकर यांनी तत्काळ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधत जनतेला १० दिवस पिण्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असेल, तर ग्रामस्थ किती सहन करणार, असा सवाल केला होता.
याबाबत सीईओ यांनी स्वतंत्र बैठक घेत योजनेला गती दिली जाईल असे सांगितले. सद्यः स्थितीत विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत ग्रामपंचायत अधिकारी, प्रशासकांना निर्देश दिले आहेत.