

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील ऐतिहासिक वारसास्थळ असलेल्या पांडवलेणी येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांसाठी सुविधा अधिक दर्जेदार करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिल्या. याप्रसंगी दान पारमिता फाउंडेशनचे अध्यक्ष व पाली भाषा अभ्यासक सुनील खरे यांनी लेणीचा इतिहास अधिकाऱ्यांना सांगितला.
धम्म लिपीत असलेले शिलालेख वाचून दाखवित, त्याचा अर्थदेखील सांगितला. धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा, ध्यानमुद्रा, भूमिस्पर्श मुद्रा, महापरिनिर्वाण मुद्रांबाबत माहिती उपस्थितांना देण्यात आली. शनिवारी (दि. ४) सकाळी मुख्य सचिव अग्रवाल यांनी त्रिरश्मी डोंगरावरील पांडवलेणी व परिसराची पाहणी केली.
यावेळी कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, उपवनसंरक्षक राकेश सेपट, उपजिल्हाधिकारी शरद घोरपडे, मकरंद दिवाकर, विभागीय वन व्यवस्थापक सुजित नेवसे, पुरातत्त्व विभागाचे सहायक अधीक्षक अभियंता हेमंतकुमार हुकरे, पुरातत्त्व विभागाचे सहायक संवर्धक संतोष महाजन, अभ्यासक रमेश पडवळ, पुरातत्त्व विद्यावेता धनश्री निगुडकर उपस्थित होते.
मुख्य सचिव अग्रवाल यांनी पाहणी दरम्यान अभ्यासकांकडून लेण्यांचा इतिहास जाणून घेत २२ गुंफांची पाहणी केली. लेणी परिसरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, संवर्धन व पर्यटन विकासाच्या कामांचा आढावा घेतला. परिसरातील पायाभूत सुविधा, प्रवेशमार्ग, पायऱ्या, सुरक्षा व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे व माहितीफलकाची पाहणी करीत मार्गदर्शक सूचना केल्या.
पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन या सुविधा अधिक सक्षम करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या ऐतिहासिक वारसा स्थळाचे जतन व संवर्धन करताना पुरातत्त्वीय महत्त्व अबाधित ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. लेणी परिसरात पार्किंग व्यवस्था, मार्गदर्शक फलक, प्रकाशयोजना आणि डिजिटल माहिती प्रणाली विकसित करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.