

सिन्नर : संदीप भोर
तालुक्यातील ठाणगाव-आडवाडी परिसरातील डोंगराळ भाग, दाट झाडी आणि नैसर्गिक अधिवासाचे महत्त्व अधोरेखित करणारी एक आगीतवेगळी घटना समोर आली आहे. या परिसरात परदेशातून स्थलांतर करणाऱ्या अत्यंत आकर्षक आणि दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या युरोपियन रोलर अर्थात नीलपंख पक्ष्यांचे तब्बल दहा ते पंधरा पक्षी एकाच वेळी आढळून आले आहेत.
वन्यजीव सप्ताहानिमित्त पक्षी निरीक्षण करताना सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक संजय लक्ष्मण गिते यांना या परदेशी पाहुण्यांचे दर्शन घडले. गेल्या पंधरा दिवसांपासून या पक्ष्यांचा या परिसरात मुक्काम असल्याची नोंद त्यांनी केली आहे.
युरोपियन रोलर हा पक्षी अंगावरील गडद आणि फिकट निळ्या रंगाच्या चमकदार छटांमुळे सहज ओळखता येतो. उडताना हवेत अचानक सूर मारणे, वेगाने कलाटणी घेणे आणि हवेतच कसरती करत फिरणे, ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.
हवेत गिरक्या घेत उडण्याच्या या अनोख्या शैलीमुळेच त्याला 'रोलर' हे नाव पडले आहे. निळ्या रंगाची आकर्षक झळाळी आणि चपल उड्डाण यामुळे पक्षी निरीक्षकांसाठी हा पक्षी विशेष आकर्षण ठरतो.
हा पक्षी भारतात कायमस्वरूपी वास्तव्य करत नाही. तो स्थलांतरित पक्षी असून, प्रजननानंतर अनुकूल हवामान आणि खाद्याच्या शोधात लांबचा प्रवास करतो. ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात स्थलांतर्याच्या मार्गावर भारतातील काही भागात तो विश्रांतीसाठी थांबतो.
ठाणगाव-आडवाडी परिसरात एकाच वेळी दहा ते पंधरा दि्सणे ही पक्षी निरीक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची नोंद आहे.
सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी गणेश रणदिवे, सहायक वनसंरक्षक रवि भोगे आणि वनपरिक्षेत्राधिकारी पूजा रक्ताटे यांच्या मार्गदर्शनखाली पक्षी निरीक्षण व वन्यजीव संवर्धनाचे कार्य सुरू आहे.
वनरक्षक संजय गिते यांनी घेतली १७ प्रजातींची नोंद
वन्यजीव सप्ताहानिमित्त २ ऑक्टोबरपासून परिसरात पक्षी निरीक्षण सुरू असताना गिते यांनी युरोपियन रोलरसह एकूण १७ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद घेतली.
ठाणगाव-आडवाडीच्या डोंगररांगा, झाडी आणि शांत नैसर्गिक वातावरण पक्ष्यांसाठी पोषक असल्याचे या निरीक्षणतून अधोरेखित झाले आहे.
निरीक्षणातून समोर आली पक्षी वैविध्याची समृद्धता
या निरीक्षणतून परिसरातील पक्षी वैविध्याची समृद्धताही पुढे आली आहे.
खाटीक, सांडोल, सुतार पक्षी, कोकिळा, पांढऱ्या छातीचा खंद्या, टिटवी, सुगरण, ठिपकेवाली मुनिया, पाकोळ्या, बुलबुल, पिंगळा आणि कोतवाल यासह विविध प्रजातींची नोंद घेण्यात आली.
निसर्गातील या जैवविहिदतेचे संवर्धन करण्यासाठी डोंगराळ भाग, झाडी, पाणवठे आणि पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास जपण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.