

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात खरीप हंगामात उद्दिष्टापेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होऊनही पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरले आहे. ५८ हजार ८८६ हेक्टरच्या सर्वसाधारण खरीप क्षेत्राच्या तुलनेत तब्बल ६२ हजार ४३४ हेक्टरवर पेरणी झाली असून, पेरणीचे उद्दिष्ट १०६ टक्के पूर्ण झाले. मात्र, शेवटच्या भरणीच्या कालावधीत पावसाने मोठा खंड दिल्यामुळे उभी पिके पिवळी पडून सुकली आहेत. त्यातच आता 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा वाढल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
तालुक्यातील आठ मंडळांना पावसाच्या प्रदीर्घ खंडाचा फटका बसला असून, चार मंडळांमध्ये २१ दिवसांहून अधिक काळ पाऊस झालेला नाही. एका मंडळात २८, दोन मंडळांमध्ये ३५, तर एका मंडळात तब्बल ४२ दिवसांहून अधिक पावसाचा खंड नोंदवण्यात आला आहे. सिन्नर मंडळात सुमारे ४० दिवस, तर शहा मंडळात ४२ दिवस पाऊस झालेला नाही. त्यामुळे सोयाबीन, मका, बाजरी, कांदा आदी खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे.
पावसाचा खंड असतानाच गेल्या काही दिवसांपासून तापमान ३४ अंशांच्या पुढे गेले आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असून, दुपारी रस्त्यांवरील वर्दळही कमी होत आहे. वाढत्या उष्णतेने जमिनीतील उरलेला ओलावाही झपाट्याने कमी होऊन, काही भागांत उभी पिके करपली आहेत.
सिन्नरच्या पूर्व भागातील पांगरी शिवारात सोयाबीनचे पीक उष्णतेमुळे जळून गेले आहे. खरीप पिकांचे नुकसान वाढल्यास आगामी काळात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकाबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
केवळ ७२ टक्के पाऊस:
तालुक्यात आतापर्यंत ३७६.२ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सप्टेंबरमध्ये अवघा ३४ मि.मी. पाऊस झाला. सरासरीच्या केवळ सुमारे ७२ टक्के पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. पेरणीनंतर सुरुवातीला झालेल्या पावसामुळे पिकांची उगवण व वाढ चांगली झाली. मात्र त्यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला आहे.
धरणात मुबलक पाणी, तरी पिके तहानलेली:
तालुक्यातील सात लघु प्रकल्पांची एकूण साठवण क्षमतेपैकी सुमारे ७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. भोजापूर धरणातही समाधानकारक पाणीसाठा आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची स्थिती तूर्तास दिलासादायक असली, तरी उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी उपयोग होणार का, हा प्रश्न कायम आहे.
उत्पादक खर्च वसूल होणार नसल्याची स्थिती:
पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाऊस गायब झाल्यामुळे दाणे भरणे, कणसांची वाढ आणि उत्पादनक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. बियाणे, खते, औषधे व मशागतीवर मोठा खर्च करून उभी केलेली पिके आता हातातून जाण्याची भीती आहे. काही शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल होणार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
"पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाऊस गायब झाल्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांनी केलेला उत्पादन खर्चही वसूल होणार नाही."
- बाळासाहेब दराडे, शेतकरी, दोडी खुर्द