

Establishment of Central Debt Relief Committee
नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशींच्या ९० व्या जयंतीनिमित्ताने आयोजित कर्जमुक्ती महाअधिवेशनात केंद्रीय कर्जमुक्ती समितीची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली. तसेच यावेळी नाशिक जिल्हा बँकेचे थकबाकीदार शेतकरी कर्ज भरणार नाहीत, शेतकरी कर्जमुक्त होणार नाहीत तोपर्यंत सर्व थकबाकीदार शेतकरी आपल्या घरांवर व शेतांवर काळे झेंडे लावून शासनाचा निषेध करतील यासह १० ठराव यावेळी झाले.
निफाड तालुक्यातील ओझर येथील जनशांतीधाम येथे स्वामिनाथन आयोगाचे अभ्यासक श्रीकांत तराळ यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमुक्त महाअधिवेशन झाले. त्यात केंद्रीय कर्जमुक्ती समितीची घोषणा करण्यात आली. यावेळी भारत सेवक समाजाचे प्रवीणकुमार राऊत, डॉ. श्याम आष्टेकर, विठ्ठल राजे पवार, धनंजय पाटील काकडे, शिवराम पाटील यांनी यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी भगवान बोराडे, दिलीप पाटील, कैलास बोरसे, सुधाकर मोगल, ज्ञानेश्वर ढेपले, अनिता कोल्हे, छाया येवले, मनीषा सोनवणे, अंजू वाधीरे, सविता जानगवळी आदी उपस्थित होते. दिलीप पाटील यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन कैलास बोरसे यांनी केले.
अशी आहे समिती: भगवान बोराडे (नाशिक), सतीश देशमुख (पुणे), विठ्ठल राजे पवार (पुणे), संजय मालोकार (अकोला), शिवराम पाटील (जळगाव), धनंजय पाटील काकडे (अमरावती), नारायण विभुते (वाशिम), स्वामी इलाजिलीयन (मुंबई), कैलास बोरसे (डांग सौंदाणे), दिलीप पाटील (देवळा), खेमराज कौर (सटाणा), सुधाकर मोगल (निफाड), अनंत पाटील (नाशिक), प्रवीणकुमार राऊत (पुणे), अशोक हेमके (जालना) यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा पूर्ण करावी, जिल्हा बँकेने सक्तीची कर्जवसुली बंद करावी, शेतकऱ्यांचा सातबारा खाते उताऱ्यावर लावलेली नावे रद्द करावी, राज्यातील सर्व शेतकरर् संघटनांनी एकत्र येऊन लढा उभारावा, १० नोव्हेंबरला सर्व राज्यभर चक्काजाम आंदोलन, रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल आदी.