

सुनील रंधवे
नाशिक : शहरात निवडणूक प्रचाराला वेग आला असून, विविध पक्षांच्या प्रचारयंत्रणेमुळे महिलांसाठी तात्पुरत्या पण हक्काच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. प्रचारसभा, घराघरांत संपर्क मोहिमा ते प्रचार सभा यांसाठी महिलांचा सहभाग लक्षणीय वाढला आहे.
महानगरपालिका निवडणूक जवळ आल्याने शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध पक्षांचे उमेदवार प्रचारात व्यस्त असताना या निवडणुकीमुळे महिलांसाठी रोजगाराची एक वेगळीच संधी उपलब्ध झाली आहे. मतदारसंघात जाऊन मतदारांशी संपर्क, पोस्टर बॅनर वाटप, सोशल मीडिया हाताळणी, कार्यालयीन कामकाज तसेच कार्यक्रम व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणावर महिलांना सहभागी करून घेतले जात आहे. महिलांना दररोज ३०० ते ५०० रुपयांपर्यंत मानधन दिले जात असून सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवणही पुरविले जात आहे. त्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांनी या कामांना प्राधान्य दिल्याचे चित्र दिसून येत आहे.
यंदाची निवडणूक प्रभाग पद्धतीने होत असल्याने प्रत्येक प्रभागात तिरंगी अथवा चौरंगी लढत पाहायला मिळत आहे. एका प्रभागातून चार नगरसेवक निवडले जाणार असल्याने किमान १२ ते १६ प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येक उमेदवार आपल्या आर्थिक क्षमतेनुसार महिलांना प्रचार कार्यात सहभागी करून घेत असून, एका प्रभागात सरासरी १०० महिलांना रोजगार मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.