

सोलापूर : मतदान प्रक्रियेची गोपनीयता, पारदर्शकता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदान केंद्रात मोबाईल, कॉर्डलेस व वायरलेस फोन वापरण्यावर सक्त निर्बंध घालण्यात आले आहेत. भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या स्पष्ट निर्देशानुसार हे नियम लागू करण्यात आले असून, त्यांचे उल्लंघन झाल्यास मतदान केंद्रांवर वाद, गैरप्रकार तसेच मतदानाचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होण्याची शक्यता वाढू शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्राच्या आत मतदारांना मोबाईल फोन नेण्यास पूर्णतः बंदी आहे. तसेच मतदान केंद्राच्या 100 मीटर परिघात कर्मचारी व पोलीस यांच्याव्यतिरिक्त कोणालाही मोबाईल, कॉर्डलेस किंवा वायरलेस फोन वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. वृद्ध, दिव्यांग अथवा विशेष गरज असलेल्या मतदारांनी जर मोबाईल आणला असेल, तर तो पूर्णतः बंद ठेवून मतदान केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी बाहेर त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीकडे सुपूर्द करणे बंधनकारक आहे.
स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त किंवा निवडणूक निर्णय अधिकारी मतदान केंद्रात किंवा केंद्राबाहेर ङ्गमोबाईल फोन जमा कक्षफ स्थापन करू शकतात. या कक्षात किमान 10 कप्प्यांचा पीजन होल बॉक्स, क्रमांकित टोकन, मतदान केंद्राचा शिक्का व प्राधिकृत अधिकाऱ्याची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक असून मोबाईल जमा व परत देतानाचे चित्रीकरण करणे आवश्यक राहणार आहे.मतदानानंतर मतदाराने दिलेले टोकन जमा केल्यानंतर संबंधित मोबाईल फोन परत दिला जाईल. स्थानिक कायदा-सुव्यवस्था व स्वयंसेवकांची उपलब्धता पाहून मोबाईल जमा कक्षाबाबत अंतिम निर्णय प्राधिकृत अधिकारी घेणार आहेत.
दरम्यान, उमेदवार, राजकीय पक्ष, त्यांचे प्रतिनिधी व नागरिकांनी या नियमांची माहिती करून घेऊन ती मतदारांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मतदान ही लोकशाहीची पवित्र प्रक्रिया असून, तिची शिस्त व गोपनीयता राखण्यासाठी सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.