

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक आणि फसवणूक खंडणी प्रकरणामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई करीत त्याच्या साथीदारांकडून तब्बल १३ कोटी ५० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. यात १३.१२ कोटी रुपयांची रोख रक्कम, मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिन्यांचा समावेश असून, अशोक खरातच्या बँक खात्यातील २.२५ कोटी रुपयांच्या ठेवी गोठवण्यात आल्या आहेत.
त्याच्या मालकीची आलिशान मर्सिडीज कारही ईडीने जप्त केल्याने या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिलांचे लैंगिक शोषण व आर्थिक फसवणुकीच्या आरोपांप्रकरणी नाशिक शहर पोलिसांनी दि. १८ मार्चला अशोक खरातला अटक केली. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती.
अटकेनंतर अवघ्या पाच दिवसांत या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करण्यात आला. एसआयटीने जवळपास दीड महिना विविध पैलूंवर तपास करत अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्या. त्यानंतर शिर्डी व नाशिक ग्रामीण पोलिसांनीही फसवणुकीच्या गुन्ह्यांचा स्वतंत्र तपास सुरू केला.
तपासादरम्यान अवतार पूजा, धार्मिक मार्गदर्शन आणि चमत्काराच्या नावाखाली लोकांकडून ५.६२ कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप समोर आला आहे. जगदंबा व समता पतसंस्थांमधील २०० कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.
ईडीकडून खरातच्या निकटवर्तीयांचीही कसून चौकशी सुरू असून, या चौकशीतून नवनवीन आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेचे धागेदोरे समोर येत आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यभर या तपासाकडे लक्ष लागले आहे.