Nashik cattle transport: चांदवड पोलिसांची धाडसी कारवाई; चार गोवंशांची सुटका

पोलिसांच्या वाहनाला समोरून धडक देत आरोपींचा पळण्याचा प्रयत्न; दोघांविरोधात जीवघेणा हल्ल्याचा गुन्हा
चांदवड पोलिसांनी अवैध गोवंश तस्करीतून सुटका केलेली जनावरे
चांदवड पोलिसांनी अवैध गोवंश तस्करीतून सुटका केलेली जनावरे
Published on
Updated on

चांदवड : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मालेगाव येथे कत्तलीसाठी अवैधरित्या नेण्यात येत असलेल्या चार गोवंशांची चांदवड पोलिसांनी जीवाची बाजी लावत सुटका केली. या कारवाईदरम्यान संशयितांनी पोलिसांच्या वाहनाला समोरून जोरदार धडक दिल्याने पोलीस निरीक्षक कैलास वाघ आणि पोलीस कॉन्स्टेबल गोविंद राऊत जखमी झाले. मात्र, जीवाची पर्वा न करता पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून दोघांना अटक केली. या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश तस्करी रोखण्यासाठी विशेष गस्त मोहीम सुरू होती. शनिवारी (दि. २३) सकाळी सुमारे सहाच्या दरम्यान चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ आणि कॉन्स्टेबल गोविंद राऊत हे मुंबई-आग्रा महामार्गावर गस्त घालत असताना एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून अवैधरित्या गोवंश वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ राहूडच्या दिशेने संशयित वाहनाचा पाठलाग सुरू केला. श्री रेणुका देवी घाटमाथा परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या संशयितांच्या कारने (एमएच ०९ बीई ८०८०) पोलिसांच्या वाहनाला (एमएच १५ जेएच ०४४६) समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात पोलीस निरीक्षक वाघ आणि कॉन्स्टेबल राऊत जखमी झाले असून पोलिसांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले.

अपघातानंतर संशयितांनी वाहन सोडून डोंगराच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून अबु सुफियान अब्दुल करीम अन्सारी (वय ३२, रा. गुलशन अश्रफ नगर, रमजानपुरा, मालेगाव) आणि मोहम्मद इरफान मोहम्मद अल्ताफ अन्सारी (वय २०, रा. अजुबी चौक, इस्लामाबाद, मालेगाव) या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले.

संशयितांच्या वाहनात चार गोऱ्हे अत्यंत अमानुष पद्धतीने बांधून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी तत्काळ जनावरांची सुटका करून त्यांना मुंगसे येथील गोशाळेत सुरक्षित हलवले. या घटनेत पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या हाताला व कंबरेला दुखापत झाली असून कॉन्स्टेबल गोविंद राऊत यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर मार लागला आहे. दोघांवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांनी चांदवड येथे भेट देऊन जखमी पोलिसांची विचारपूस केली तसेच कारवाईबद्दल पोलिसांचे कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news